सहा घरफोड्यांतील फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:26 AM2019-09-09T00:26:56+5:302019-09-09T00:27:12+5:30
सहा घरफोड्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला एडीएसच्या पथकाने जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सहा घरफोड्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई रविवारी सकाळी शहरातील नवीन मोंढा भागात करण्यात आली असून, यावेळी २८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
किशोरसिंग रामसिंग टाक उर्फ टकल्या (रा. जालना) असे आरोपीचे नाव आहे. जालना शहरातील विविध भागातील घरफोड्यांमध्ये हात असलेला किशोरसिंग टाक हा नवीन मोंढा भागात फिरत असल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जाधव यांनी सहकाऱ्यांसमवेत नवीन मोंढा भागात किशोरसिंग याचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलीस आल्याचा सुगावा लागताच आरोपीने दुचाकीवरून धूम ठोकली. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने शहरातील चोऱ्यांमध्ये हात असल्याची कबुली दिली. त्याच्याकडील २८ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि यशवंत जाधव, सपोउपनि एम.बी.स्कॉट, पोकॉ संदीप चिंचोले, राजू पवार, धनाजी कावळे आदींनी ही कारवाई केली.
घरफोडीत सराईत
एडीएसच्या पथकाने जेरबंद केलेल्या किशोरसिंग टाक याच्याविरूध्द तालुका जालना पोलीस ठाण्यात घरफोडीचे पाच, चंदनझिरा ठाण्यात एक व इतरही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४त्याच्याकडे चौकशी सुरू असून, इतर गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर किशोरसिंग टाक याने गत दीड महिन्यापूर्वी दुखीनगर भागातून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच मंठा चौफुली येथील एक दुकान फोडल्याचेही त्याने सांगितले. त्याच्याकडून एक दुचाकी व गॅससिलेंडर पोलिसांनी जप्त केला आहे.