लांडग्याच्या हल्ल्यात ६ शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:15 AM2019-02-10T00:15:43+5:302019-02-10T00:16:46+5:30
भोकरदन तालुक्यातील विझोरा येथील शेतकरी नारायण महिपत गावंडे यांच्या शेतातील गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर लांडग्याने हल्ला करून सहा शेळ्यांचा फडशा पाडला.
धावडा : भोकरदन तालुक्यातील विझोरा येथील शेतकरी नारायण महिपत गावंडे यांच्या शेतातील गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर लांडग्याने हल्ला करून सहा शेळ्यांचा फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
या घटनेची माहिती गावंडे यांनी तात्काळ महसूल तसेच वन विभागाला दिली. माहिती मिळाल्यावर वनपाल तसेच तलाठ्यांनी शनिवारी गावंडे यांच्या शेतात जाऊन पंचनामा केला. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या. परंतु, शनिवारी सकाळी उठल्यावर नारायण गावंडे यांचा मुलगा अंबादास गावंडे शेतात गेला असता, त्याला शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच वनपाल संतोष दोडके, वनरक्षक दिलीप जाधव युवराज बोराडे तसेच तलाठी एन. ए. काळवाघे यांनी घटनेचा पंचनामा करुण पायाचे ठसे ट्रेस पेपरवर घेतले असता ते लांडग्याचे असल्याचे स्पष्ट झाले.
लांडग्याने शेळ्या फस्त केल्याने शेतकरी गावंडे यांचे जवळपास ५० हजारपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये या भागात लांडगे, रानडुकर तसेच अन्य हिंस्त्र प्राणी हे पाण्यासह अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचे सांगण्यात आले. गावंडे यांच्या गोठ्यातील शेळ्यांवरील हल्ला देखील अशाच पध्दतीतून झाला असल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
वन्य प्राण्यांच्या या वाढत्या वावरामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वन विभागाच्यावतीने हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या पशुपालकांना आर्थिक मदत देण्याचे निकष असल्याची माहिती देण्यात आली.