सहा सिंचन प्रकल्पांना मिळणार ७७५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:11 AM2018-07-20T01:11:36+5:302018-07-20T01:11:52+5:30
वर्षभरापूर्वी पाठविलेल्या जालना जिल्ह्यातील सहा लघु सिंचन प्रकल्पांना आता पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत ७७५ कोटी रूपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील घोषणा नुकतीच केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने जालन्यासाठी हा एक प्रकारचा जॅकपॉटच म्हणावा लागेल.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वर्षभरापूर्वी पाठविलेल्या जालना जिल्ह्यातील सहा लघु सिंचन प्रकल्पांना आता पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत ७७५ कोटी रूपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील घोषणा नुकतीच केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने जालन्यासाठी हा एक प्रकारचा जॅकपॉटच म्हणावा लागेल.
जालना जिल्ह्यातील सहा लघुप्रकल्पांना मंजुरी मिळावी म्हणून येथील लघु पाटबंधारे विभागाने सहा सिंचन प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यावर बरीच चर्चा होऊन त्याला आता निधी मिळणार असल्याने जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघण्यास मोठी मदत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यांमध्ये ४८.६८ टक्के एवढी वाढ होणार असून, या पाण्याच्या माध्यमातून जवळपास ५ हजार २८४ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
वर्षभरापूर्वी लघु पाटबंधारे विभागाच्या येथील कार्यालयाने पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत हे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविले होते. या संदर्भात नुकतीच दिल्ली येथे बैठक होऊन विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागातील ८३ लघुसिंचन प्रकल्प पूर्ण करण्या संदर्भात केंद्र सरकारचे अर्थसहाय्य मिळणार आहे. केंद्र सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यासाठी केंद्रीय जलसंपदा, नदीविकास योजनेतून या प्रकल्पांना निधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास १४ जिल्ह्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
या सहा प्रकल्पांचा समावेश
भोकरदन तालुक्यातील पळसखेडा प्रकल्पासाठी १७२८.८६ लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. यातून ७.८३ द.ल.घ.मि. एवढे पाणी या प्रकल्पामध्ये साठविता येणार असून, त्यातून ५७० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. मंठा तालुक्यातील पाटोदा येथील प्रकल्पासाठी ८४.७५ लाख रुपये मिळणार असून, यातून ८.६०७ द.ल.घ.मी. साठवण क्षमता निर्माण होणार असून, जवळपास ११०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. खोराड सावंगी या प्रकल्पासाठी १५१८.२१ लाख रुपये मिळणार असून, यातून २.५५ द.ल.घ.मी. पाणासाठा निर्माण होईल. या पाणीसाठ्याच्या माध्यमातून २५४ हेक्टर जमिनी ओलिताखाली येणार आहे. जालना तालुक्यातील हातवन लघू प्रकल्प पूर्णत्वासाठी ३७३१७.१७ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, यामध्ये १५.०३ द.ल.घी. साठवण क्षमता निर्माण होईल. या माध्यमातून परिसरातील जवळपास १६७५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जाफराबाद तालुक्यातील बरबडा प्रकल्पासाठी १९७७६.८५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, या माध्यमातून ११.६ द.ल.घ.मी. पाणी साठणार आहे. यातून १२२५ हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. जाफराबाद तालुक्यातील सोमखेडा येथील प्रकल्पासाठी ३८४९ कोटी रुपये अपेक्षित असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ३.६२ द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण होईल, त्यातून ४४५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.