आणखी सहा कंपन्यांची लस येण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:31+5:302021-01-17T04:26:31+5:30

जालना : कोविशिल्ड, को-व्हॅक्सिन या लसींना केंद्र शासनाने मान्यता दिल्याने आज लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, आणखी सहा ...

Six more companies are on the way to vaccination | आणखी सहा कंपन्यांची लस येण्याच्या मार्गावर

आणखी सहा कंपन्यांची लस येण्याच्या मार्गावर

Next

जालना : कोविशिल्ड, को-व्हॅक्सिन या लसींना केंद्र शासनाने मान्यता दिल्याने आज लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, आणखी सहा कंपन्यांची लसही तयार होण्याच्या मार्गावर आहे. पुढील दोन- तीन महिन्यांत त्या लसींची चाचणी आणि मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या लसींना मान्यता मिळाली तर बाजारपेठेत लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या कंपन्यांच्या लसीचा राज्या- राज्यांना पुरवठा केला जाणार असून, लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जालना येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना नियंत्रणासाठी असलेल्या लसीची प्रतीक्षा संपली असून, देशभरात दोन लसी आज आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत. मार्च- २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि देशातील नागरिकांची चिंता वाढली. त्यानंतर कोरोनाचा फैलाव देशभर झाला. या काळात आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फ्रंटलाइनवर काम करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कोविन अ‍ॅपवर ८ लाख जणांची नोंदणी झाली आहे. एकाला दोन वेळेस लस द्यावी लागणार आहे. त्या अनुषंगाने १७ लाख ५० हजार डोसची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. आजवर पुरवठा दारांनी ६० टक्के लसीचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठाही लवकरच होईल, अशी आशा आहे. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत लस मिळावी, ही आमची इच्छा आहे. त्यादृष्टीने केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. केंद्र शासन शेवटच्या क्षणापर्यंत राज्य शासनाला सहकार्य करेल, अशी आशा आहे; परंतु काही अडचणी आल्याच तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महाविकास आघाडी शासन गरजू एकाही व्यक्तीला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाहीही टोपे यांनी यावेळी दिली.

पद्मजा सराफ यांना दिली पहिली लस

जालना जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा सराफ यांना प्रथम लस देण्यात आली. त्यानंतर कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय जगताप, मेट्रन ज्योती मुरकुटे, रुग्णवाहिका चालक अमोल काळे यांना लस देऊन या लसीकरणास सुरुवात करण्यात आली.

कॅप्शन : जालना येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणास शनिवारी प्रारंभ झाला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जि.प.च्या सईओ निमा अरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख आदी. (१६ जेएनपीएच-०१)

===Photopath===

160121\16jan_1_16012021_15.jpg

===Caption===

कॅप्शन : जालना येथील जिल्हा रूग्णालयात कोरोना लसीकरणास शनिवारी प्रारंभ झाला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जि.प.च्या सईओ निमा अरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख आदी. (१६ जेएनपीएच-०१)

Web Title: Six more companies are on the way to vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.