जिल्ह्यातील सहा शाळांना लागणार टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:50 AM2017-12-30T00:50:17+5:302017-12-30T00:50:20+5:30

दहापेक्षा कमी पटसंख्या आणि कमी दर्जा असलेल्या शाळांना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सहा शाळांना फटका बसला आहे.

 Six schools in the district will be closed | जिल्ह्यातील सहा शाळांना लागणार टाळे

जिल्ह्यातील सहा शाळांना लागणार टाळे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दहापेक्षा कमी पटसंख्या आणि कमी दर्जा असलेल्या शाळांना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सहा शाळांना फटका बसला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली असून, सहा शाळांना कायमस्वरूपी टाळे लागणार आहे. या शाळातील ३२ विद्यार्थ्यांचे दुसरीकडे समायोजन केले जाणार आहे.
साक्षरता वाढ, शिक्षणाचा विस्तार आणि गुणवत्ता वाढीचे आव्हान असताना राज्य शासनाने कमी पटसंख्या आणि खालचा दर्जा मिळालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार राज्यातील १,३१४ शाळा पहिल्या टप्प्यात बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यात एकूण १,५७७ शाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबतचे पत्र जिल्हा परिषद शिक्षण विभागास प्राप्त झाले आहे. त्यानुसार मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वसंनगर-माळेगाव, जि. प. शाळा पाडळी झोपडपट्टी, प्राथमिक शाळा अंभोरा शेळके या अनुक्रमे चार, नऊ आणि सात विद्यार्थी असणा-या तीन शाळा बंद होणार आहेत. परतूर तालुक्यातील मुळेवस्ती भागातील शून्य पटसंख्येची, बदनापूर तालुक्यातील शिवाची वाडी येथील दहा पटसंख्या असलेली, तसेच अंबड तालुक्यातील हसनापूरमधील पुंडलिकनगर येथील शून्य पटसंख्या असलेली शाळा बंद होणार आहे. बंद होणा-या सहा शाळांमधील ३२ विद्यार्थ्यांचे एक किलोमीटर परिसरातल्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. तसेच बंद होणा-या शाळांमध्ये कार्यरत १२ शिक्षकांचे इतरत्र समायोजन करण्यात येणार आहे.

Web Title:  Six schools in the district will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.