समृद्धी महामार्गावर वेग आवरा; सात दिवसांत ३० अपघात, सहा वन्यप्राण्यांचाही गेला जीव
By दिपक ढोले | Published: December 19, 2022 12:51 PM2022-12-19T12:51:53+5:302022-12-19T12:53:06+5:30
समृद्धी महामार्गावर शिर्डी ते नागपूरपर्यंत अपघातांची मालिकाच
- दीपक ढोले
जालना : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. टकाटक असलेल्या या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवीत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये जवळपास ३० वाहनांना अपघात झाला असून, ६५ घटनांमध्ये वन्यप्राण्यांना दुखापत झाली आहे, तर दोन ठिकाणी वाहनांना आगदेखील लागली आहे. सहा वन्यप्राण्यांचा जीव गेला आहे.
राज्याची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरला जाण्यासाठी ११ ते १२ तास लागतात. हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारने समृद्धी महामार्ग तयार केला. नागपूर ते शिर्डीपर्यंतचे ५२० किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. या महामार्गावर १२० पर्यंत वेगमर्यादा देण्यात आली आहे. परंतु, लोक अतिवेगाने वाहने चालवीत असल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत जवळपास ३० वाहनांचा अपघात झाला आहे, तर बहुतांश वन्यप्राण्यांना धडक लागून त्यांचा जीवही गेला आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
दुचाकी चालकांवर होणार कारवाई
समृद्धी महामार्गावर दुचाकीला एन्ट्री नाही. असे असतानाही बहुतांश दुचाकी चालक समृद्धी महामार्गावरून दुचाकी चालवित आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
वाहनधारकांनी खबरदारी घ्यावी
समृद्धी महामार्गावरून वाहनधारक वेगमर्यादेपेक्षा अधिक गतीने वाहने चालवित आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. शिर्डीपासून ते नागपूरपर्यंत जवळपास ३० वाहनांना अपघात झाला आहे. तर ६५ घटनांमध्ये वन्यप्राण्यांना दुखापत झाली आहे. दोन वाहनांना आगदेखील लागली आहे. वाहनधारकांनी खबरदारी घ्यावी.
- अभय बी. दंडगव्हाळ, सपोनि. महामार्ग पोलिस, जालना
असे घडले अपघात
१) जालना येथील निधोना इंटरचेंजजवळ आयशर उलटले.
२) जालना जिल्ह्यातील सोमठाण्याजवळ कार लोखंडी खांबाला धडकली.
३) वाशिम जिल्ह्यातील केनडगाव येथे गॅसच्या टाक्या घेऊन जाणारा ट्रक उलटला.
४) पिंपरी माळी (जि. बुलढाणा) परिसरात दुभाजकाच्या खड्ड्यात ट्रक उलटला.
५) लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींच्या कारचा टायर धामणगाव (जि. अमरावती) परिसरात फुटला.
६) औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील घायगाव शिवारात एका कारने अचानक पेट घेतला.
७) सिंदखेड राजा तालुक्यातील विझोरा शिवारात कारचा अपघात झाला. यात बालकासह तीनजण जखमी झाले.
८) नागपूर जिल्ह्यातील टोलनाक्याजवळच दोन कारचा अपघात झाला.