जालना जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्पांची तहान कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:13 AM2019-07-05T00:13:53+5:302019-07-05T00:15:04+5:30
भोकरदन तालुका वगळता इतरत्र दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४१ प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पावसाळ्याचा एक महिना लोटत आला आहे. मात्र, भोकरदन तालुका वगळता इतरत्र दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४१ प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत. तर २० प्रकल्पांमध्ये मृतपाणीसाठा आहे. पावसाअभावी प्रकल्पांची तहान अन् गावा-गावातील पाणीटंचाई कायम आहे.
गतवर्षी अपुऱ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून टँकरसह अधिग्रहणावर लाखो रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. यंदा जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मात्र, भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही कायम आहे. जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांपैकी एक मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. तर चार प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. केवळ दोन प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. यात भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात सद्यस्थितीत ५.१८ दलघमी म्हणजे ८५.९५ टक्के पाणी उपलब्ध आहे. गत आठवड्यात या प्रकल्पात केवळ १.२२ दलघमी पाणी उपलब्ध होते. तर धामणा प्रकल्पात ८.५१ दलघमी म्हणजे ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर जिल्ह्यात ६४ लघू प्रकल्प आहेत. पैकी ४१ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक पडले आहेत. २० प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. एका प्रकल्पात ० ते २५ दलघमी पाणी उपलब्ध आहे. पावसाअभावी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. परिणामी प्रकल्पांवर आधारित असलेल्या शेकडो गावांसह शहरी भागातील पाणी प्रश्न कायम आहे.
५ टक्के उपयुक्त पाणीसाठा : केवळ १५ टक्के पाऊस
जिल्ह्यातील सात पैकी केवळ दोन मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पात एकूण १८.७४ टक्के पाणी उपलब्ध आहे. तर लघू प्रकल्पात ०.०४ टक्के पाणी असून, जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण ५.४३ टक्के उपयुक्त पाणी उपलब्ध आहे.
गतवर्षी याच कालावधीत प्रकल्पांमध्ये केवळ ७.७८ दलघमी म्हणजे ३.२७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १२.९० दलघमी म्हणजे ५.४३ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षीपेक्षा २.१६ .टक्यांनी साठा वाढला आहे.
भोकरदन तालुक्यात पाणीच पाणी
भोकरदन तालुक्यात आजवर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी केवळ भोकरदन तालुक्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेच्या ७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. इतर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट आहे.