कृत्रिम हात-पायांमुळे फुलले दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:43 AM2019-08-26T00:43:55+5:302019-08-26T00:44:19+5:30
तब्बल १६० अबाल-वृध्द दिव्यांगांना कृत्रिम हात-पायांसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकमत समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समाचार आणि साधू वासवानी ग्रुपच्या वतीने रविवारी जालना शहरात आयोजित मोफत कृत्रिम हात-पाय वाटप शिबिरात अनेक दिव्यांग आशेने आले होते. शिबिरात आलेल्या तब्बल १६० अबाल-वृध्द दिव्यांगांना कृत्रिम हात-पायांसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामुळे जीवन जगणे सुसहाय्य होणार असल्याने शिबिरातून परतणाºया प्रत्येक दिव्यांगाच्या चेहºयावर हस्य फुलल्याचे दिसून आले.
कार्यक्रमास नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, जिल्हा प्रतिनिधी रमेश बागडी, व्यवस्थापक मकरंद शहापूरकर, संजय देशमुख, लायन्स क्लब जालनाचे वरिष्ठ सदस्य रामनारायण अग्रवाल, मधुकर बैंक्वेटचे संचालक हर्ष जयपुरिया, साधू वासवानी ग्रुपचे मिलिंद जाधव यांच्यासह उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख डॉ. कैलास सचदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी लोकमत समाचार च्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, मोफत हात-पाय वाटप वाटप उपक्रमामुळे शहरासह जिल्हाभरातील दिव्यांगांना मोठा आधार मिळाला आहे. असे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविणे काळाची गरज आहे. शिवाय नगर पालिकाही दिव्यांगांसाठी विशेष काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव म्हणाले, लोकमत समाचारच्या वतीने प्रथमत: २०१५ मध्ये कृत्रिम हातपाय बसविण्याचे शिबीर राबविण्यात आले. त्यावेळी परराज्यातील गरजूंनीही नाव नोंदणी केली होती. त्यावेळी या शिबिराची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आजवर राबविलेल्या शिबिरातून ४ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. यावेळी मधुर कैक्वेट हॉलचे संचालक हर्ष जयपुरिया, डॉ. कैलाश सचदेव, सलील जैन यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी जालना जिल्ह्यासह बीड, परभणी, हिंगोली, लातूर आदी ठिकाणाहून आलेल्या २ वर्षे वयाच्या मुलापासून ६० वर्षे वयाच्या वृध्दांना अशा एकूण १६० जणांना मोफत कृत्रिम हात-पायांसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
गरजूंना कृत्रिम हात-पाय बसविण्यासाठी साधू वासवानी ग्रुपचे मिलिंद जाधव, सुशील ढगे, अनुराग सिंगमनी तसेच पुणे येथीलच महावीर इंटरप्राईजेसचे सलील जैन, संजय जाधव, राहुल सरोज, ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र राठोड, दत्तात्रय राक्षे यांचे या शिबिरास विशेष सहकार्य मिळाले.