मुलगी सुखरूप आल्याने पालकांच्या चेहऱ्यावर हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:03 AM2019-11-27T01:03:33+5:302019-11-27T01:03:59+5:30
घर सोडून निघून गेलेल्या एका दहा वर्षीय मुलीला राखीव पोलीस दलातील पोलीस शिपाई दीपक गावंडे यांच्या पत्नी पूजा यांच्या सतर्कतेमुळे आणि दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या मदतीमुळे आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आई सारखी रागावते,नेहमी मारते म्हणून आईविषयी मनात राग धरून घर सोडून निघून गेलेल्या एका दहा वर्षीय मुलीला राखीव पोलीस दलातील पोलीस शिपाई दीपक गावंडे यांच्या पत्नी पूजा यांच्या सतर्कतेमुळे आणि दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या मदतीमुळे तिची समजूत काढून सुखरूपपणे आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलीला सुखरूप घरी परतल्याचे पाहून पालकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी दामिनी पथकाचे तसेच राखीव पोलीस दलातील गावंडे दाम्पत्याचे आभार मानले. दरम्यान, दामिनी पथकाच्या वतीने पल्लवी जाधव यांनी गावंडे दाम्पत्याचा सत्कार केला.
जालना शहरातील नूतन वसाहत भागातील रहिवासी अनिता सुभाष पांडव हे दांपत्य भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे ते मंगळवारी ( दि.२६) सकाळी ते दोघेही भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये गेलेले होते. तेव्हा त्यांची मुलगी साक्षी (वय १० वर्ष) ही पिशवीमध्ये कपडे घेऊन घरातून निघून गेली. दरम्यान, ती पायी चालत चालत महसूल कॉलनीत फिरत असताना या भागात राहणारे राखीव पोलीस दलातील शिपाई दीपक गावंडे यांच्या पत्नी पूजा गावंडे यांनी साक्षीची विचारपूस केली. तेव्हा साक्षीने सांगितले की, माझी आई मला नेहमी रागावते आणि मारते म्हणून मी घर सोडून चालले आहे. मला घरी जायचे नाही. तुमच्याकडेच मला राहू द्या, असे तिने सांगितल्यामुळे पूजा गावंडे यांनी ही बाब लगेच त्यांचे पती दीपक गावंडे यांना सांगितली. दीपक गावंडे यांनी तात्काळ दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना ही माहिती दिली. पल्लवी जाधव यांनी वेळ न दवडता ताफ्यासह महसूल कॉलनी गाठून गावंडे दाम्पत्याची भेट घेत साक्षीला समजावून सांगून तिची आस्थेवाईकपणे समजूत काढली. तेव्हा साक्षी परत आई वडिलांकडे जाण्यास तयार झाली.
त्यानंतर पल्लवी जाधव यांनी पथकासह साक्षी पांडव हिचे घर गाठले. साक्षीची आई अनिता पांडव आणि वडील सुभाष पांडव यांना समजावून सांगितले. साक्षी लहान आहे. तिला मारहाण न करता प्रेमाने समजावून सांगावे, असा सल्ला दिला. त्यानंतर पांडव दांपत्याने साक्षीला घरी आणल्याबद्दल दामिनी पथक आणि पोलीस कर्मचारी गावंडे दाम्पत्याचे आभार व्यक्त केले.
यावेळी जाधव यांच्या सोबत दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी एस.एम.खांडेभराड, ए. डी.साबळे, आर.एल.राठोड , यू. पी. साबळे, वाहनचालक व्ही. एस. तायडे यांचा सहभाग होता.
दरम्यान , राखीव पोलिस दलातील पोलीस शिपाई दीपक गावंडे व त्यांच्या पत्नी पूजा यांचा सत्कार केला. बाल दिनी देखील दामिनी पथकाने एका हरवलेल्या मुलाला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले होते. दामिनी पथकाच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .