धान्याच्या आडून गुटख्याची तस्करी; शहागड येथे ३४ लाखाचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 02:39 PM2020-09-15T14:39:33+5:302020-09-15T14:42:57+5:30
बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती.
शहागड (जि.जालना) : बीडकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकवर गोंदी पोलिसांनी कारवाई करून ३४ लाख १५ हजाराचा गुटखा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सकाळी गहिणीनाथ नगर येथे करण्यात असून, या कारवाईत ट्रकसह तब्बल २०७ गोण्यांमधील गुटखा असा ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बँक व्यवहाराचे मेसेज खातेदाराच्या मोबाईलवर येणे बंद झाले.https://t.co/e3peuOUK94
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 15, 2020
बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून गोंदी पोलिसांनी मंगळवारी सकाळी औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गहिणीनाथ नगर येथे सापळा रचून एका ट्रकवर (क्र. ए. के. ५६- ५४१३) कारवाई केली. या कारवाईत ३५ लाखाचा गुटखा व ट्रक असा एकूण ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनासह गुटखा शहागड पोलीस चौकीत लावण्यात आला असून, अन्न व औषध प्रशासनामार्फत पंचनामा केला जाणार आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, फौजदार हनुमंत वारे, जमादार भास्कर आहेर, नारायण माळी, नितीन खरात, गिरी यांच्या पथकाने केली.
ट्रकमध्ये सडक्या ज्वारीची पोते
पोलिसांनी कारवाई केली तरी पाहणीत त्यांना केवळ धान्य दिसावे यासाठी ट्रकमध्ये सडक्या धान्याचे पोते ठेवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी इतर पोत्यांचीही तपासणी केल्यानंतर आतमध्ये गुटखा दिसून आला. तब्बल २०७ गोण्यांमध्ये हा गुटखा आढळून आला आहे.
जालना येथील दात्याचे रक्तदान https://t.co/inv2VXzgTU
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 15, 2020