घरासमोर दावणीला बांधला होता बैल, अचानक नागाने काढला फणा; पुढं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 10:22 AM2022-08-18T10:22:43+5:302022-08-18T10:34:29+5:30
दावणीला बांधलेल्या एका बैलासमोर सलग 20 मिनिटे फणा काढून नागाने बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला.
जालना - गावाकडे नाग निघालाय हे वाक्य देखील दिवसभर चर्चेचा विषय असतो. कोणाच्या घरी निघाला, शेतात निघाला की आणखी कुठे आढळून आला. मग, त्याला पकडायला कोणी सर्पमित्र आला होता का, तो साप निघून गेली की कोणाला चावला, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळते. अनेकदा पाळीव प्राण्यांसोबत या नागांची नजरानजर होत असते. जालन्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. चक्क दावणीला बांधलेल्या बैलासमोर फणा काढून नाग उभारला होता. हे दृश्य पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दावणीला बांधलेल्या एका बैलासमोर सलग 20 मिनिटे फणा काढून नागाने बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दावणीला बांधलेला बैल जराही या नागाला न घाबरता मोठ्या तोऱ्यात टाईटच उभा राहिला. समोर फणा काढून डौलत असलेल्या नागाचा जराही या बैलावर परिणाम झाला नाही. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे ही घटना घडली. काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये ही घटना कैद केली आहे.
जालना - दावणीला बांधलेल्या बैलासमोर नागाने काढला फणा, पुढं काय घडलं pic.twitter.com/AWboqe8QRA
— Lokmat (@lokmat) August 18, 2022
अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील शेतकरी सोनाजी जाधव यांच्या शेतातील बखारीसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बैलाला बांधण्यात आलं होतं. या ठिकाणी बैल चारा खात असताना बैलासमोर अचानक पाच फूट लांब असलेला नाग आला आणि फणा काढून तब्बल 20 मिनिटे उभा राहिला. त्याने बैलाला घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला. पण, बैल जराही डगमगला नाही. ही बातमी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांपर्यंत गेली आणि बघता बघता रस्त्यावर गर्दी झाली. पण कुणीही नागाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला नाही. सगळे शांत उभे राहून नाग आणि बैलामधील हे बघाबघीचं युद्ध पाहू लागले. अखेरीस, नागाने माघार घेत तेथून धूम ठोकली आणि उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी बैलाचे कौतुक करत सुटकेचा निश्वास टाकला.