सोशल मिडिया, मोबाईलमुळे पती-पत्नीमध्ये वाढती भांडणे; भरोसा सेलमधील तक्रारीमधून उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:38 PM2020-12-09T16:38:35+5:302020-12-09T16:40:15+5:30
जिल्हा पोलीस दलांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये गत काही वर्षांपासून पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादाच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
जालना : मोबाईलवर तास तास बोलणे, व्हाॅट्सॲप, फेसबुक आदी सोशल मीडियाचा वाढलेला वापर पती-पत्नींमधील भांडणाला फोडणी टाकत आहे. गत दोन वर्षांत भरोसा सेलमध्ये तब्बल १२६४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सामोपचारानंतरही समेट घडत नसल्याने त्यातील २४७ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.
जिल्हा पोलीस दलांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये गत काही वर्षांपासून पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादाच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यसनाधीनता, संशयी वृत्तीसह मोबाईलचा अतिवापर पती-पत्नींमधील वादाचे प्रमुख कारण ठरत आहे. येथील भरोसा सेलमध्ये सन २०१९ मध्ये ७४९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ४१३ प्रकरणांत समोपचारानंतर आपापसात तडजोड करण्यात आली. तडजोड होत नसल्याने २१६ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली. १९ प्रकरणांत कोर्ट समन्स देण्यात आले असून, १०१ प्रकरणे प्रलंबित आहेत, तर चालू वर्षात ५१५ प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील ७६ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली आहे. तडजोड होत नसलेली ३१ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत, तर १२ प्रकरणांत कोर्ट समन्स देण्यात आले असून, ३९७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.
नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणे
संशयी वृत्ती, व्यसनाधीनता, वाढलेला मोबाईलचा वापर, सतत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे, हुंड्याची मागणी, प्रॉपर्टीचा वाद, शेतजमिनीचे कारण, सासू-सासऱ्यांपासून अलिप्त राहण्याची मागणी यासह इतर विविध कारणांनी पती-पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात वाद वाढले आहेत. विशेषत: मोबाईलचा अतिवापर हा त्रासदायक ठरत असल्याचे चित्र भरोसा सेलमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दिसून येत आहे.
४८९ प्रकरणांत समेट
भरोसा सेलमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींनुसार माहेर- सासरच्या मंडळींसह दाम्पत्यांमध्ये चर्चा घडवून आणली जाते. त्यांचे समुपदेशन करून त्यांचा मोडकळीस आलेल्या संसारात पुन्हा हास्य फुलविण्याचे काम अधिकारी, कर्मचारी करतात. गत दोन वर्षांमध्ये भरोसा सेलकडून ४८९ प्रकरणांत आपापसात तडजोड करण्यात आली आहे.
मोबाईलचा वापर, संशयीवृत्ती, व्यसनाधीनता आदी कारणांमुळे पती-पत्नींमध्ये भांडणे होत असल्याचे आमच्याकडे दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दिसून येते. तक्रार दाखल झाल्यानंतर दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचा मोडकळीस आलेला संसार पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
- एस.बी. राठोड, भरोसा सेलप्रमुख