समाजाने बद्रीनारायण बारवालेंच्या कार्याचा आदर्श घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:03 AM2018-09-18T01:03:39+5:302018-09-18T01:04:48+5:30
बद्रीनारायण बारवाले यांनी जे योगदान दिले, पुढच्या पिढीने त्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बद्रीनारायण बारवाले यांनी ज्याप्रमाणे हरित क्रांतीमध्ये हायब्रीड बियाणांमध्ये संशोधन करून देशाला अन्नधान्याच्या बाबातील स्वयंपूर्ण होण्यासाठी जे योगदान दिले ते निश्चित मैलाचा दगड ठरला होता. गणपती नेत्रालयासह शिक्षण क्षेत्रात त्यांनी ते कार्य केले ते उल्लेखनीय असून, पुढच्या पिढीने त्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी गणपती नेत्रालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बोलताना केले.
गणपती नेत्रालयाला पंचवीस वर्र्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यपाल सी.विद्यासागर राव हे जालना दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांची उपस्थिती होती. प्रारंभी गणपती नेत्रालयाचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले यांनी प्रास्ताविक केले. गणपती नेत्रालयाची उभारणी वडील स्व.बद्रीनारायण बारवाले यांनी कुठल्या स्थितीत केली याची सविस्तर माहिती सांगून या नेत्रालयाचा लाभ गोर-गरिबांना अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी केली असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना राज्यपाल विद्यासागर राव म्हणाले की, हरितक्रांती करणाºयांमध्ये सुब्रमण्यम, स्वामीनाथन यांनी जे योगदान दिले आहे, त्याच धर्तीवर स्व.बद्रीनारायण बारवाले यांचा सिंहाचा वाटा असल्याचे ते म्हणाले. गणपती नेत्रालयात सर्वात मोठी ‘आय बँक’ असल्याची माहिती मिळाल्यावर आपण समाधानी झालो. आतापर्यंत नेत्रालयाने जे उल्लेखनीय कार्य केले आहे असेच कार्य त्यांची पुढची पिढी निश्चितपणे पुढे नेईल असा विश्वास आपल्याला असल्याचे ते म्हणाले. यावेळी स्व.बद्रीनारायण बारवाले यांच्या जीवनचरित्रावर आधारित कॉफीटेबल पुस्तकाचे विमोचन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान मोदींकडून कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा मुख्य उद्देश आहे. यातून देशात कुशल मनुष्यबळ निर्मितीसह छोटे आणि मोठे उद्योजक निर्माण होऊ शकतात ही बाब लक्षात घेऊन जालना येथे विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र पंचवीस एकर परिसरात उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मुक्तिसंग्राम आणि ऐन गणेशोत्सवात आपल्याला या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी मराठीतून आभार मानले. मराठवाडा मुक्तिसंग्राम प्रमाणेच त्यावेळी तेलंगणा हे राज्यही निजामाच्या संस्थानात होते. त्यामुळे आम्हीही निजामाकडून होणारे जुलूम, अत्याचार सहन केले आहेत. जालना आणि आपल्या परिवाराचा जवळचा संबंध असल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमास खा.चंद्रकांत खैरे, आ.राजेश टोपे, आ.नारायण कुचे, जि.प.अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, माजी मंत्री शंकरराव राख, माजी आ.कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, माजी खा.उत्तमसिंह पवार, विष्णू पाचफुले, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, बाला परदेशी, डॉ.विजय अराध्ये, घनशाम गोयल, डॉ.उषा झेर, माजी आ.अरविंद चव्हाण आदींची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार वैद्यकीय संचालक डॉ. ऋषिकेश नायगावकर यांनी मानले.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देशात अन्नधान्याची टंचाई असताना स्व.बद्रीनारायण बारवाले यांनी हायब्रीड सीडस्च्या माध्यमातून संशोधन करून मोठी क्रांती केली. त्यामुळे आज सव्वाशेकोटी जनतेला अन्नधान्याची मुबलकता असल्याचे ते म्हणाले. या हायब्रीडच्या वापरामुळे उत्पादनातही भरघोस वाढ झाल्याचा अनुभव बागडे यांनी सांगितला.
खा.रावसाहेब दानवे म्हणाले की, बद्रीनारायण बारवाले यांनी जालन्याचे नाव सीडस् उद्योगाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर पोहोचवले. त्यांच्या कर्मभूमीमध्ये शिक्षण, आरोग्य यालाही मोठे महत्त्व त्यांनी दिले. त्यामुळेच आज देशभरात आम्ही कुठेही असलो तर जालन्यात गणपती नेत्रालयात उपचारासाठी आल्याचे अनेकजण जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला बद्रीनारायण बारवाले यांच्या दूरदृष्टीचा अनुभव येत असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आपले अनुभव सांगताना कर्नाटकातील बंगळुरू येथे बियाणे महामंडळाचे संचालक असतांना भेट दिली असता तेथे दोनशे एकर परिसरात महिकोचे प्रक्रिया केंद्र असल्याची माहिती मिळाल्यावर मोठे समाधान वाटले. शेतकºयांच्या जीवनात आर्थिक संपन्नता यावी यासाठी बद्रीनारायण बारवाले यांनी जे कार्य केले ते निश्चितच प्रेरणादायी आहे.