पहिल्या डोसचे सोडा दुसऱ्याचे वांधे : नागरिकांमधून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:30 AM2021-04-21T04:30:16+5:302021-04-21T04:30:16+5:30
लसीकरण करण्यासाठी एकीकडे आवाहन केले जात असतानाच दुसरीकडे ही लस नेमकी कोणत्या केंद्रांवर उपलब्ध नाही. याचा साधा तपाशीलही प्रशासनाकडून ...
लसीकरण करण्यासाठी एकीकडे आवाहन केले जात असतानाच दुसरीकडे ही लस नेमकी कोणत्या केंद्रांवर उपलब्ध नाही. याचा साधा तपाशीलही प्रशासनाकडून दिला गेला नाही. अनेकांनी लसीचा पहिला डोस मोठ्या उत्साहाने घेऊन स्वत:चे सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल केले. ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांना साधारणपणे २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा असे निकष आहेत; परंतु मेसेज आलेल्या तारखांना संबंधित नागरिक लसीकरण केंद्रावर गेल्यावर त्यांना दोन ते तीन वेळेस लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता नेमकी लस कधी येणार हे अद्याप प्रशासनही सांगू शकत नाही. ग्रामीण आणि शहरी भागात असे दोन्ही पातळींवर लसीकरणाचे नियोजन हुकल्याचे दिसून येत आहे.
चौकट
सात लाख लसींचा साठा मागविला
जालना जिल्ह्यात सध्या १०१ लसीकरण केंद्रांवर लस देण्याची मोहीम सुरू होती. जवळपास एक लाख ६० हजार नागरिकांना पहिला डोस दिला होता. नंतर त्यापेक्षा ५० टक्के कमी जणांना दुसरा डोसही दिला. नंतर मात्र आता कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोसही त्याच लसीचा घ्यावा लागतो; परंतु ही लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे ही लस आम्ही आठवडाभरापूर्वीच मागविली होती; परंतु ती अद्याप उपलब्ध न झाल्याने ही अडचण येत आहे; परंतु ही अडचण लवकरच दूर होईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.