शेतक-यांच्या तोंडचा घास मातीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:43 AM2018-02-12T00:43:37+5:302018-02-12T00:44:37+5:30
नैसर्गिक संकटाने तोंड देत असलेल्या शेतक-यांवर अवकाळीचे आभाळ फाटले. खरिपातील बोंडअळी आणि हमीभावाने त्रस्त असलेला शेतकरी रब्बीच्या आशेने सावरत असताना जिल्ह्यात रविवारी गारपिटीने धुमाकूळ घातला. वादळी वा-यास गारपिटीने जबरदस्त तडाखा दिला. काही मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे बळीराजाच्या तोंडापर्यंत आलेला घास पुन्हा मातीत मिसळला गेला. या संकटाने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हंगामी गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, तूर या पिकांच्या नुकसानीचे क्षेत्रही मोठे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नैसर्गिक संकटाने तोंड देत असलेल्या शेतक-यांवर अवकाळीचे आभाळ फाटले. खरिपातील बोंडअळी आणि हमीभावाने त्रस्त असलेला शेतकरी रब्बीच्या आशेने सावरत असताना जिल्ह्यात रविवारी गारपिटीने धुमाकूळ घातला. वादळी वा-यास गारपिटीने जबरदस्त तडाखा दिला. काही मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे बळीराजाच्या तोंडापर्यंत आलेला घास पुन्हा मातीत मिसळला गेला. या संकटाने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हंगामी गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, तूर या पिकांच्या नुकसानीचे क्षेत्रही मोठे आहे.
जालना तालुक्यात सकाळी आठच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आहे. क्षणार्धातच अंधारून आले. त्यानंतर लगेच टपो-या गारांचा पाऊस सुरू झाला. वाघु्रळ, उमरद, गोंदेगाव, सिंदखेड, पोखरी, कुंबेफळ, इंदलकरवाडी, धावेडी, थार, पानशेंद्रा, तांदूळवाडी नंदापूर, कडवंची, घाणेवाडी, माळशेंद्रा, पिरपिंपळगाव, रामनगर, बाजीउम्रद, जामवाडी, थार, नंदापूर, अहंकार देऊळगाव, धारकल्याण, वंजारउमद्र, रामनगर, धावेडी, गोलापांगरी गावातील पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणच्या द्राक्ष बागा, शेडनेट हाऊस, पॉलीहाऊस, टरबूज, शिमला मिरची, कारले या पिकांच्या सिड्स प्लॉटचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
कडवंची येथील शेतकरी अच्युतराव परकाळे यांची एका एकरातील द्राक्षबाग भुईसपाट झाली. नंदापूर येथे सीताफळ व डाळिंब बागेचेही नुकसान झाले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी थार, नंदापूर, कडवंची आदी गावांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्ष बागांच्या झालेल्या नुकसानीची माहिती देताना काही शेतकºयांना रडू कोसळले. परिस्थिती आणि शेतकºयांची अवस्था पाहून राज्यमंत्री खोतकर यांनाही अश्रु अनावर झाले होते. जाफराबाद तालुक्यातील ३५ गावांमधील द्राक्ष, केशर आंबा, डाळिंब उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केशर आंबा उत्पादकांनी या वर्षी गटशेतीच्या माध्यमातून परदेशात आंबा पाठविण्याचे नियोजन केले होते. मात्र, गारपिटीमुळे सर्वच उद्ध्वस्त झाल्याचे काही शेतकºयांनी सांगितले. मंठा तालुक्यातील तब्बल ४७ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले. या भागात हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी अंभोरा शेळके, देवठाणा, उस्वद आदी गावांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली. गारपिटीमुळे जखमी झालेल्या शेतकºयांची लोणीकर यांनी भेट घेतली.
अंबड तालुक्यातील अंबड तालुक्यातील शेवगा परिसरात सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेवगा, हारतखेडा, वाघलखेडा, सारंगपूर, धनगर पिंपरी, लालवाडी, मसई, मठपिंपळगाव, आलमगाव आदी गावांमधील मोसंबी बागांसह, नव्याने उभारलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.
काही शेतकºयांनी मोठ्या क्षेत्रावर लावलेल्या बियाणे कांद्याचेही गारपिटीने नुकसान झाल्याचे माळशेंद्रा येथील शेतकरी कृष्णा जाधव यांनी सांगितले. मंठा तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, भाजपचे राहुल लोणीकर यांनीही पाहणी करुन शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
४८ तास खबरदारीचा इशारा
येत्या ४८ तासात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे.
बाजार समितीत धावपळ
जालना बाजार समितीमध्येही सकाळी भाजीपाला लिलाव सुरू होता. गोबीची बोली शंभर रुपये कॅरेटने सुरू होती. तसेच अन्य भाजीपाल्यालाही चांगला भाव होता. मात्र, गारपीट सुरू होताच शंभर रुपये दराने विक्री होणारे कोबीचे कॅरेट ४० रुपयांनी विकले. शेतकºयांनी आहे, तो भाजीपाला कसाबसा विक्री करून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - दानवे
जिल्ह्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी खा. रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईत भेट घेऊन केली. खा. दानवे यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागातील पिकांचे, फळांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.
शेतक-यांना नुकसान भरपाई द्या - टोपे
च्जालना जिल्ह्यात रविवारी सकाळी वादळ व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आ. राजेश टोपे यांनी केली. शेतकºयांच्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा बियाणे, द्राक्षे, मोसंबी व आंबा या पीक फळबागांचे आतोनात नुकसान झालेले आहे. याबाबत रेवगाव व परिसरातील प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पाहणी केली. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आ. टोपे यांनी केली आहे.
जालना तालुक्यातील वंजार उम्रद, गोदेगाव, वाघ्रुळ, इंदलकरवाडी व परिसरातील गावांना भेटी देऊन जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी शेतकºयांशी संवाद साधला. गारपिटीने नुकसान झालेल्या रामचंद्र गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, बाबूराव खरात, लक्ष्मण इंदलकर, अंबादास खरात, विठ्ठल इंदलकर आदी शेतकºयांना आपले दु:ख शब्दांतून मांडणे अत्यंत कठीण झाले होते. नुकसानग्रस्त शेतक-यांना शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...अन्यथा आंदोलन करू -जेथलिया
भाजप सरकारकडून शेतक-यांना केवळ आश्वासने मिळत आहे. यापूर्वीही गारपिटग्रस्तांना मदत मिळालेली नाही. सोयाबीन अनुदान दिले नाही. शेतीमाला भाव मिळत नसुन केवळ आश्वासने देऊ नका. तातडीने नुकसान भरपाई द्या, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा कॉग्रेस कमिटी जालना जिल्हा अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी उस्वद-देवठाणा येथील गारपीट झालेल्या भागातील पिकांची पाहणी दरम्यान बोलताना दिला.
अकोला देव परिसरातील गावामध्ये पंधरा ते वीस मिनिटे गारपीट झाली. आतापर्यंत शंभर वर्षांच्या काळात अशी गारपीट पहिल्यांदाच पाहवयास मिळाली, असे वृद्ध शेतकरी बोलत आहे. ज्वारी, गहू, हरबरा तसेच शेडनेटमधील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
- संजय राठोड, सरपंच, अकोला देव
जालना तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांच्या नुकसानीची सकाळी पाहणी केली. काही शेतकºयांनी कर्ज काढून बागांवर मोठा खर्च केला आहे. हे सांगताना शेतकºयांना अश्रु अनावर झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनास दिले आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकºयांनी खचून न जावू नये. आपण व्यक्तीश: व सरकार म्हणून शेतक-यांच्या पाठीशी आहे.
- अर्जुन खोतकर, राज्यमंत्री, पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग
जिल्ह्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांसह कृषी अधिकाºयांना दिले आहेत. तसेच पीकविमा कंपन्यांनाही याबाबत कळविले आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जातील.
- बबनराव लोणीकर, पालकमंत्री जालना