सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:31 AM2019-12-15T00:31:50+5:302019-12-15T00:32:10+5:30
सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून महामार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. या महामार्गावरील अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे
सय्यद इरफान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून महामार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. या महामार्गावरील अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे. चालू वर्षात आजवर या महामार्गावर ३७ अपघात झाले असून, यात २१ जणांचा बळी गेला आहे.
चालू वर्षात या राष्ट्रीय महामार्गावर अंबड तालुक्याच्या २५ किलोमीटर हद्दीत ३७ अपघात झाले आहेत. या अपघातात २१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येकांना गंभीर दुखापतीमुळे जायबंदी व्हावे लागले आहे. शहागड (ता.अंबड) मधून जाणारा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनला असून, या महामार्गावर वावरणाऱ्या वाहन चालक तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येडशी - औरंगाबाद क्र. ५२ या राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार होत असून, या महामार्गावरून मुंग्यांप्रमाणे वाहनांची वाहतूक सुरू असते. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असल्याने या महामार्गावर गतिरोधक कुठेच टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून सुसाट वेगाने धावणाºया वाहनांची संख्या अधिक आहे. त्या मानाने या महामार्गावरील अपघाताच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात शहागड ते डोणगाव फाटा (ता.अंबड) या २५ किलोमीटर अंतरात ३७ भीषण अपघात होऊन २१ जणांचे बळी गेले आहेत. किरकोळ व गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याची माहिती गोपनीय शाखेचे पो. कॉ.महेश तोटे यांनी दिली.
या महामार्गावरील उड्डाणपुलावर, उड्डाणपुलाच्या पायथ्याशी, पैठण फाटा, डोणगाव फाटा इ. ठिकाणी हे अपघात झालेले आहेत. दरम्यान आठवडाभरापूर्वी शहागडच्या उड्डाणपुलावर एका मुकादमाला ट्रकने चिरडले, तीन दिवसांपूर्वी शहागडला एका टोयोटा गाडीने बैलगाडी फरफटत नेली होती. असे अनेक अपघात हे नित्याचेच आहेत.
जखमींना मिळते अनेकांची मदत
शहागडसह परिसरात राष्ट्रीय महामार्गावर कुठेही अपघात झाला, तर मदत कार्यासाठी अनेक व्यावसायिक धावतात. मुक्तार तांबोळी, लक्ष्मण धोत्रे, कदीर तांबोळी, विनायक शिंदे, अशफाक शहा, विनायक मचे, सिराज काझी, इमतियाज मनियार यांच्यासह इतर अनेक युवक जखमींना उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत करतात. शिवाय हातात काठी घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत करतात. रूग्ण वाहिका बोलाविणे, जखमींवर उपचार होईपर्यंत रूग्णालयात थांबणे, अपघातातील मृतांच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना मदत करण्याचे काम हे युवक सातत्याने करतात.
कारवाई व्हावी
सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे सुसाट वाहन चालकांविरूध्द कारवाई होण्यास मदत होणार आहे. शिवाय संबंधित प्रशासनानेही सातत्याने कारवाईचे सत्र राबविणे गरजेचे असल्याचे उपसभापती बाळासाहेब नरवडे यांनी सांगितले.