दिवाळीच्या सुटीवर आलेल्या सैनिकाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 07:22 PM2021-11-04T19:22:36+5:302021-11-04T19:23:09+5:30
विनाेद जनार्दन शिवणेकर हे दिवाळी सणानिमित्त दोन महिन्यांच्या सुटीवर आले होते.
भोकरदन (जि. जालना) : कारचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका सैनिकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सांयकाळी भोकरदन- सिल्लोड रोडवरील इब्राहीमपूर फाट्याजवळ घडली. या अपघातात सैनिक विनोद जनार्दन शिवणेकर (वय २८ रा. पाडळी ता. जि. बुलडाणा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.
विनाेद जनार्दन शिवणेकर हे दिवाळी सणानिमित्त दोन महिन्यांच्या सुटीवर आले होते. मंगळवारी दुपारी चिखली तालुक्यातील मासरूळ येथील सासरे पुंजाराम यांच्याकडे गेले होते. विनोद शिवणेकर व पुंजाजी कराजकर हे दोघे गिरणी खरेदी करण्यासाठी कारने सिल्लोड येथे गेले होते. सिल्लोडहून परत येत असताना भोकरदन- सिल्लोड रोडवरील इब्राहीमपूर फाट्याजवळ सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नियंत्रण सुटून कार उलटली. यात दोघेही गंभीर जखमी झाले.
दोघांनाही सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासून विनोद शिवणेकर यांना मृत घोषित केले. या प्रकरणी भोकरदन पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास ना.पो.कॉ. दादाराव बोर्डे हे करीत आहेत. विनोद शिवणेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार आहेत.