आघाडीत खदखद ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:47 AM2018-01-10T00:47:38+5:302018-01-10T00:47:52+5:30

वर्षभरापूर्वी जालना नगरपालिकेत सत्ता मिळविलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये कमालीची खदखद पसरलेली आहे.

Some corporators of congress front are unhappy | आघाडीत खदखद ...!

आघाडीत खदखद ...!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वर्षभरापूर्वी जालना नगरपालिकेत सत्ता मिळविलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये कमालीची खदखद पसरलेली आहे. ठराविक नगरसेवकांना कोट्यवधींची कामे दिली जात असून, इतरांना दडपशाहीने जेरीस आणण्याचा डाव खेळला जात आहे. गटातटाच्या राजकारणाला कंटाळून काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, त्यांचा लवकरच पक्षप्रवेशही होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
वर्षभरापूर्वी जालना नगर पालिकेच्या ६१ वॉर्ड आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने निकालानंतर पालिकेत आघाडीची सत्ता आली.
त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शहरातील विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. या निधीतून केवळ भाजप नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे केली जात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील ठराविक नगरसेवकांना विकास कामे दिली जात असल्याने सत्तेत असून ‘उपाशी’ राहण्याची वेळ आघाडीच्या नगरसेवकांवर आली आहे. तर काँग्रेसच्या ‘बाहुबली’ नगरसेवकांना कामे दिली जात असल्याने प्रामाणिकपणे काम करणा-या नगरसेवकांमध्ये खदखद आहे.
यातील काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, खा. रावसाहेब दानवे यांनीही आघाडीच्या नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आगामी काही महिन्यांत जालना न.प.ची महापालिका करण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न असून, याच पार्श्वभूमीवर भाजपने शहर व परिसरात ताकद वाढविण्याच्या दृष्टीने राजकीय आयुधे वापरण्यास सुरुवात केली आहे. आघाडीच्या नगरसेवकांना आपल्या तंबूत आणून पालिकेवर सत्ता मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दोन वॉर्डांचा एक प्रभाग असल्याने विकासकामे करताना ‘दादा’ नगरसेवकांनी स्वत:च कामे घेण्यास सुरुवात केली असून, संपूर्ण प्रभागात आपल्यालाच कामे मिळावीत, अशी या नगरसेवकांची भूमिका असल्याने इतर नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी आहे.
गटातटाच्या राजकारणामुळे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करणा-यांमध्ये असंतोष पसरला आहे. आता ही कोंडी या पक्षांचे नेते कसे फोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जायचे तर खुशाल जा
काँग्रेस पक्ष सोडण्याची भाषा करणारे केवळ याच पक्षामुळे निवडून आले आहेत. याचा विसर या नगरसेवकांना पडला आहे. शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अशांचा दोन्ही वेळा पराभव झाला. ज्याला सोडचिठ्ठी द्यायची असेल, त्यांनी द्यावी. पक्ष कुणाला रोखणार नाही.
- कैलास गोरंट्याल, माजी आमदार, जालना

Web Title: Some corporators of congress front are unhappy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.