गुंतवणुकीसाठी ‘सोनियाचा दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:23 AM2019-04-06T00:23:20+5:302019-04-06T00:23:35+5:30
पाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडव्याच्या मूहूर्तावर सोने खरेदीला मोठे महत्व आहे. परंतु दरवर्षी असे काही मुहूर्त आल्यावर सोन्याचे दर चढे होत असत, परंतु यंदा हा पाडवा अपवाद ठरला. यावेळी ३४ हजार २०० वरून सोन्याचा एका तोळ्याचा भाव हा थेट दोन हजारांनी घसरला. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गुढी पाडव्या निमित्त जालना बाजारपेठ सजली आहे. विशेष करून इलेक्ट्रॉनिक्स, इलेट्रीक वस्तूंच्या बाजारात गर्दी दिसून आली. तर वाहन बाजारातही मोठा उत्साह दिसून आला. एकूणच दुचाकी आणि चारचाकी गाड्या खरेदीसाठी अनेकांनी चक्क महिन्याभरापूर्वी गाड्यांची बुकींग केल्याची माहिती देण्यात आली. एकूणच मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकां प्रमाणे व्यापारीही सज्ज झाले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर हे वाढलेलेच होते, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एकूणच आयात-निर्यातीचा परिणाम भाव घसरण्यावर झाल्याची माहिती जालना येथील भरत ज्वेलर्सचे संचालक भरत जैन यांनी सांगितले.
एका तोळ्यामागे थेट दोन हजाराने दर घसरण्याची ही बऱ्याच वर्षानंतरची घटना असल्याचेही जैन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
वित्तीय कंपन्या सरसावल्या
आज तुम्हाला टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन तसेच दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीसाठी शून्य टक्के अनामत रक्कम न भरता ते तुमच्या सीबीलची नोंद पाहून कर्ज देत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी थेट या दुकानांमध्ये मुक्काम ठोकून असून, ज्या ग्राहकाला कर्ज हवे आहे, अशांची कागपत्रांची तपासणी करून ती योग्य वाटल्यास लगेचच कर्ज दिले जात आहे. मोबाईल कंपन्यांनी देखील घसघशीत सूट दिल्याचे सांगण्यात आले.