नोटीस मिळताच विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:27 AM2020-12-24T04:27:54+5:302020-12-24T04:27:54+5:30
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा भरूनही इंडिया इन्शुरन्स कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत ...
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा भरूनही इंडिया इन्शुरन्स कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत जिल्हा ग्राहक मंचची नोटीस जातात विमा कंपनीने बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा केले.
तीर्थपुरी येथील शेतकरी विठ्ठल वाजे यांनी फळबागेच्या विम्यापोटी मोसंबी एक हेक्टरसाठी ३८०० रुपये, तर ६० गुंठे केळीसाठी ३९६० रुपये भरले होते, तर गणेश वाजे यांनी ९७ गुंठे मोसंबीचा ३ हजार ७३४ रुपये व ६० गुंठे केळीचा ३९६० रुपये असा दोन्ही शेतकऱ्यांनी २२ ऑक्टोबर २०१८ रोजी इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा भरला होता. तो मंजूरही करण्यात आला. काही शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले; परंतु या दोन्ही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळालेच नाहीत. विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी व कंपनीकडे लेखी तक्रारी केल्या, तरीही कंपनीकडून टाळाटाळ होत होती. त्यानंतर दोन्ही शेतकऱ्यांनी अॅड. प्रदीप जाधव, अॅड. मयूर ढवळे यांच्या मार्फत ग्राहक मंचात तक्रार केली होती. त्यावेळी कंपनीने पहिली नोटीस घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी दुसरी नोटीस पाठविण्यात आली. दुसऱ्या नोटिसीची तामील होताच कंपनीचे धाबे दणाणले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्यात आली.
...अखेर मिळाला न्याय
इंडिया इन्शुरन्स कंपनीला नोटीस मिळताच कंपनीने तीर्थपुरी येथील शेतकरी विठ्ठल वाजे यांच्या खात्यावर मोसंबीचे एक हेक्टरचे २५ हजार ८०० व व ६० गुंठे केळीचे ३९ हजार ६००, असे ६५ हजार ४०० रुपये जमा केले, तर गणेश वाजे यांच्या ९७ गुंठे मोसंबीचे २५ हजार २६ रुपये, तर ६० गुंठे केळीचे ३९ हजार ६००, असे एकूण ६४ हजार ६२६ रुपये बँक खात्यात जमा केले.