सौमित्र यांना दु:खी राज्य काव्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:12 AM2019-04-07T00:12:15+5:302019-04-07T00:12:36+5:30
दु:खी राज्य काव्य पुरस्कार सौमित्र यांना कृषिभूषण विजय आण्णा बोराडे यांच्या हस्ते शनिवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात प्रदान करण्यात आला.
जालना : वाढत्या वयानुसार कविता सुध्दा बदलायला हवी. वयाने मोठे होऊ तितके कवितेच्या जवळ जाता यावे हेच आपण करत आलो आहोत. कवितेतून अनुभवाच्या कोंबापर्यंत जाण्याचा प्रयत्न सदैव सुरु आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, नट (सौमित्र) किशोर कदम यांनी केले. स्व.राय हरीश्चंद्र साहनी -दु:खी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा दु:खी राज्य काव्य पुरस्कार सौमित्र यांना कृषिभूषण विजय आण्णा बोराडे यांच्या हस्ते शनिवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना किशोर कदम म्हणाले की, तारुण्यात लिहीलेला ‘गारवा’ ही कोवळ्या वयातील भावना वाचक आजही सोडत नाही. १५ वर्षानंतर दुसरा काव्य संग्रह आला दु:खी पुरस्कार २० व्या वर्षी मिळत असल्याने पाडवा आणि गारवा दोघेही तरुण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. धकाधकीच्या जीवनात आयुष्य समजावून घेता आले पाहिजे. वाढत्या वया सोबत समज येते असे मानले जाते, परंतु समज आल्यावर त्याचे प्रत्यक्ष जीवनात प्रतिबिंब उमटणे गरजेचे आहे. आज आपण गारवा प्रमाणेच अनेक कवीता संग्रह लिहिल्याचेही किशोर कदम म्हणाले.
हा राज्य काव्य पुरस्कार मला मिळाल्याचा मोठा आंनद आणि समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले. जालन्यातील रसिकांच्या उपस्थिती बद्दलही त्यांनी कौतुक केले. पुरस्काराचे स्वरूप रोख २१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह असे आहे. प्रारंभी स्व. नंदकिशोर साहनी ट्रस्टचे अध्यक्ष विनीत साहनी यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी या कार्यक्रमाचे साहित्य विश्वातील महत्व विशद केले.
सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले. तर पंडित तडेगावकर यांनी आभार मानले. यावेळी साहनी परिवारातील सदस्यांसह शहरातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी चित्रकार ज्ञानेश्वर गिराम, प्राध्यापक विलास भुतेकर, कालिदास वेदपाठक, संजीवनी डहाळे, गजेंद्र पळसकर, यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरणानंतर विजय चौरमारे, आबा पाटील, भारत दौडंकर, बालाजी सुतार, शोभा रोकडे यांचे कवी संमेलन पार पडले.
रुपेरी पडदा व काव्यांतून समाज परिवर्तन व्हावे- बोराडे
शेती आणि माती वातावरण व समाजातील बदलत्या हवामानामुळे बदलले आहे. गावखेड्यातील गोडवा दुरावला असून राजकारण आणि प्रबोधन या दोन्ही क्षेत्राकडून हे बदलणे अशक्य आहे. अशा स्थितीत रुपेरी पडदा आणि काव्यांतून समाज परिवर्तन होईल अशी अपेक्षा कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केली.