जिल्ह्यात प्रथमच रब्बी हंगामात सोयाबीनची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:31 AM2021-01-20T04:31:11+5:302021-01-20T04:31:11+5:30
मागील काही वर्षात गतवर्षी जून महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजरी लावली होती. या पावसामुळे पिकांची पेरणी वेळेवर होण्यास ...
मागील काही वर्षात गतवर्षी जून महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजरी लावली होती. या पावसामुळे पिकांची पेरणी वेळेवर होण्यास मदत झाल्याने चांगले उत्पादन हाती येईल, अशी अपेक्षा शेतक-यांना होती. जिल्ह्यात कधी नव्हे तो १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. परंतु, अनेक कंपन्यांचे सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले. यात हजारो शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी केलेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कृषी विभागाने आदेश काढला होता. परंतु, जाचक अटींमुळे अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत. असे असतानाच परतीच्या पावसानेही जिल्ह्यात हजेरी लावल्याने हाती आलेले सोयाबीनचे पीक पुन्हा वाया गेले होते. त्यामुळे यंदाही बाजारपेठेत बोगस बियाणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने यंदा शेतक-यांना रब्बी हंगामात सोयाबीनची पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यास प्रतिसाद देत दुधना-काळेगाव, सायगाव, तळणी, पाथ्रुड-काळेगाव आदी गावांमधील शेतक-यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतक-यांनी सोयाबीनचे पीक घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी होतो, हा येणा-या काळातच स्पष्ट होईल.
अनेकांकडून बियाण्यांची मागणी
रब्बी हंगामातील सोयाबीनची पेरणी करण्याचा कालावधी अद्याप संपलेला नाही. त्यामुळे जवळपास ५० शेतक-यांनी एका नामांकित कंपनीकडे बियाण्यांची मागणी केलेली आहे. त्यांना बियाणे मिळताच सदरील शेतकरी सोयाबीनची पेरणी करणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.