सोयाबीनने याही वर्षी शेतकऱ्यांना तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 06:58 PM2020-11-11T18:58:53+5:302020-11-11T19:07:52+5:30
भावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना फटका
जालना : जिल्ह्यात कपाशीसोबतच सोयाबीनने शेतकऱ्यांना तारले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा सोयाबीनीची आवक वाढली असल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता सर्वात जास्त उत्पादन हे २०१७ मध्ये असल्याची माहिती जालना बाजार समितीतील आवकचा आढावा घेतला असता पुढे आली.
जिल्ह्याचे प्रमुख पीक म्हणून प्रारंभीपासून कापसाची ओळख अहे. परंतु, गेल्या दशकभराचा विचार केल्यास सोयाबीनने मोठी मजल मारली आहे. अवघ्या ९० दिवसांत येणाऱ्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असून, काढणीला तुलनेनेने कमी खर्च येतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. यात कोरडवाहू शेतकऱ्यांचा मोठा हिस्सा असल्याचे सांगण्यात आले. यंदा सोयाबीनला सरासरी तीन हजार पाचशेचा भाव मिळाला असून, जास्तीत जास्त भाव हा चार हजार शंभर रूपये आजघडीला आहे. हे सोयाबीनचे दर आगामी काळात चार हजार ५०० रूपयांवर जातील असे सांगण्यात आले. दरम्यान, आजही बाजारपेठेत सोयाबीनची आवक बऱ्यापैकी येत आहे.
गेल्या पाच वर्षांतील सोयाबीनची आवक
वर्ष आवक भाव
२०१५ दोन लाख १२ हजार, ३२५९ ते ३३००
२०१६ दोन लाख ३२ हजार, ३५०० ते ३६००
२०१७ सहा लाख ४५ हजार, २७०० ते ३०००
२०१८ पाच लाख ७२ हजार, २७०० ते ३०००
२०१९ चार लाख १७ हजार, ३२२५ ते ३५००
२०२० चार लाख २५ हजार, ३२०० ते ४१००