दिंडी मार्गाच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:08 AM2018-04-15T01:08:10+5:302018-04-15T01:08:10+5:30
शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम वाटूर-परतूर दरम्यान वेगात सुरू आहे. मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे शेतक-यांचा विरोध मावळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम वाटूर-परतूर दरम्यान वेगात सुरू आहे. मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे शेतक-यांचा विरोध मावळत आहे.
तालुक्यातील वाटूर, परतूर आष्टी, लोणी भागात ६० किलोमीटरवर शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गाचे काम सुरू आहे. सुुरुवातीच्या टप्प्यात दिंडी मार्गात जमीन जात असल्याने शेतक-यांनी ही काम बंद पाडले होते. अगोदर जमिनीचा मोबदला द्यावा नंतरच दिंडी मार्गाचे काम सुरू करावे, अशी भूमिका शेतक-यांनी घेतल्यामुळे हे काम काही दिवस रेंगाळले होते.
मात्र, पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, उपविभागीय अधिकारी ब्रिजेस पाटील, तहसीलदार डी.डी. फुपाटे यांनी बैठका घेऊन शेतक-यांशी सकारात्मक चर्चा केली. शेतक-यांची एक गुंठाही जमीन फुकट घेतली जाणार नाही, असे आश्वासन लोणीकर यांनी दिले. प्रशासनाने हालचाली सुरू केल्याने शेतक-यांचा दिंडी मार्गास विरोध कमी झाला आहे. शहरातजवळ तसेच रोहिणा परिसरात दिंडी मार्गाचे काम वेगात सुरू आहे. परतूर येथील पेट्रोलपंप ते साईबाबा मंदिर दरम्यान वाहतूक टेलिफोन भवनमार्गे वळवून दुतर्फा काम सुरू करण्यात आले आहे.