दमदार पावसामुळे पेरणीपूर्व कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:29 AM2019-06-24T00:29:08+5:302019-06-24T00:29:37+5:30

पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे.

The speed of sowing activity due to strong rains | दमदार पावसामुळे पेरणीपूर्व कामांना वेग

दमदार पावसामुळे पेरणीपूर्व कामांना वेग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मागील दोन दिवस जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे. विशेषत: उकाड्यापासूनही काही प्रमाणात सुटका झाली आहे. असे असले तरी पेरणीसाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
रविवारी जालना शहरासह परिसरात ढगाळ वातावरण होते.
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात शनिवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मागील पंधरा दिवसांपासून परिसरात कडक ऊन तापत होते. समाधानकारक पाऊस झाल्याने या भागातील काही शेतक-यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.
दुष्काळामुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मृग नक्षत्र सुरु होवूनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. शनिवारी सायंकाळी वालसावंगी, धावडा, पारध, शेलूद, वडोद तांगडा, वाडी, पद्मावती परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतक-यांनी मका, कपाशी, मूग सोयाबीनची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. यंदा पाऊस उशिरा आल्याने बहुतांश शेतक-यांची धूळ पेरणी वाया गेली आहे. दोन दिवसापूर्वी केलेली पेरणी पावसामुळे साधल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाण्याअभावी उन्हाळी मिरचीचे पीक धोक्यात आले होते. या पावसामुळे मिरचीचे पीक वाचले आहे. रविवारी आठवडी बाजार भरतो. मात्र, पाऊस पडल्याने गावातील शेतकरी कुटुंबातील शाळकरी मुलांसह सर्वच सदस्यांनी शेती कामासाठी शेतात धाव घेतली. त्यामुळे बाजारात नागरिकांची गर्दी कमी दिसत होती.
राजूर : प्रदीर्घ विश्रांतीनंतर राजूरसह परिसरात शनिवारी सायंकाळी समाधानकारक भीज पाऊस झाला. त्यामुळे सुखावलेल्या शेतकºयांनी रविवारी चाढ्यावर मूठ धरत पेरणीची लगबग सुरू केल्याचे चित्र राजूर परिसरात दिसून आले.
पावसाअभावी कपाशी लागवडीसह पेरण्या खोळंबल्या होत्या. दुष्काळाच्या चटक्याने त्रस्त असलेले शेतकरी पावसाने पाठ फिरवल्याने हैराण झाले होते. चातक पक्षाप्रमाणे शेतकरी पावसासाठी वाट पाहात होते. अखेर शनिवारी सायंकाळी राजूरसह परिसरात पावसाने हजेरी लावली. पेरणी योग्य पाऊस झाल्याने राजूरसह परिसरातील शेतक-यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे. रविवारी सकाळीच शेतक-यांनी शेतीचा रस्ता धरला. या भागात कपाशी लागवडीसह मूग, उडीद, मकाच्या पेरणीला सुरूवात केली. शेतकरी पेरणीच्या कामाला लागल्याने रविवारी आठवडी बाजारच्या गर्दीवर मोठा परिणाम दिसून आला.
राजूरचा आठवडी बाजार तालुक्यात सर्वात मोठा असतो. पंचक्रोशितील सुमारे तीस ते पस्तीस गावातील नागरिक बाजारला हजेरी लावतात. परंतू शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने अनेकांनी बाजारात गर्दी करण्यापेक्षा शेतात जाणे पसंत केले. त्यामुळे आठवडी बाजारातील गर्दी कमी होऊन, येथील आर्थिक उलाढालीवरही परिणाम झाला होता.
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतक-यामध्ये उत्साह संचारला आहे. या भागातील शेतक-यांनी खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु केली आहे.
शनिवारी मृग व आद्रा नक्षत्राचा जोड होता. या जोडावर पावसाचे पेरणीयोग्य आगमन झाले. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे. रविवारी शाळेला सुटी असल्याने शेतकरी आपल्या मुलांसह शेतीमशागतीच्या कामी लागले होते. पाऊस नसल्याने गत अनेक दिवसांपासून खरिपाच्या पेरण्या खोंळबल्या होत्या. शनिवारच्या पावसाने पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला. ज्या शेतक-यांनी धुळपेरणी केली होत्या त्या देखील सार्थकी लागल्या आहेत.

Web Title: The speed of sowing activity due to strong rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.