जनावरांबाबत कारवाईला गती; एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:57 AM2019-10-03T00:57:33+5:302019-10-03T00:58:16+5:30
शहरातील मुख्य रस्त्यावर, बाजारपेठेत फिरणाऱ्या मोकाट जनावरांवरील कारवाईच्या मोहिमेला वाहतूक शाखा, नगर पालिका प्रशासनाने गती दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील मुख्य रस्त्यावर, बाजारपेठेत फिरणाऱ्या मोकाट जनावरांवरील कारवाईच्या मोहिमेला वाहतूक शाखा, नगर पालिका प्रशासनाने गती दिली आहे. शिवाय रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाºया नूतन वसाहत भागातील एकाविरूध्द बुधवारी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या दिसून येतो. मोकाट जनावरांमुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघाताला मिळणारे निमंत्रण पाहता या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत होती. या दृष्टीने मागील वर्षीपासून वाहतूक शाखेने पावले उचलली होती. नागरिकांचा रेटा पाहता नगर पालिका, वाहतूक शाखेने गत आठवड्यापासून मोकाट जनावरांवरील कारवाईच्या हालचाली सुरू केल्या होत्या. याबाबत पशुपालकांची बैठकही घेण्यात आली. पशुपालकांनी आपली जनावरे रस्त्यावर सोडू नयेत, यासाठी वाहतूक शाखा व पालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे. शिवाय जनावरे कोंडण्यासाठी शहरातील विविध भागांत असलेल्या गो-शाळांची पाहणीही करण्यात आली होती. गोशाळांची पाहणी व पशुपालकांशी संवाद साधून जनजागृती केल्यानंतर कारवाईसाठी पालिकेने पथकाला नियुक्त केले.
पालिकेने नियुक्त केलेल्या पथकाने सोमवारी १३ तर बुधवारी ४ जनावरे पकडून मोतीबाग येथील पालिकेच्या कोंडवाड्यात टाकली आहेत. संबंधित पशुपालकांना दैनंदिन ७०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. कारवाईनंतर मुदतीत जनावरे सोडवून नेली नाहीत तर संबंधितांच्या जनावरांचा लिलाव करण्यात येणार आहे. तसेच पशुपालकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, बुधवारी पोउपनि शेख नजीर शेख नसीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारायण सांडू कांबळे (रा. नूतन वसाहत, अंबड रोड, जालना) यांच्याविरूध्द कदीम पोलीस ठाण्यात कलम २८९, २९१ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे यांनी ३० सप्टेंबर रोजी सकाळी नूतन वसाहत भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे सोडून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीवरून कांबळे विरूध्द गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोकॉ राठोड हे करीत आहेत. रस्त्यावर जनावरे सोडणा-या पशुपालकावर गुन्हा दाखल झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. पथकाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.