प्रशासकीय कामकाजाला देणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:31 AM2018-02-07T00:31:53+5:302018-02-07T00:32:15+5:30

जिल्ह्याच्या विकासासंबंधी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय कामांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

Speeding up the administrative work | प्रशासकीय कामकाजाला देणार गती

प्रशासकीय कामकाजाला देणार गती

googlenewsNext

बाबासाहेब म्हस्के/जालना : जिल्ह्याच्या विकासासंबंधी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय कामांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. त्यांनी मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी मुलाखतीत विविध मुद्द््यांवर आपली भूमिका मते मांडली.
मूळ दिल्लीच्या असलेल्या अरोरा भारतीय प्रशासन सेवेतील २०१४ बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांनी संगणकशास्त्रात बी. टेक. पूर्ण केले असून लोकप्रशासन विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. सध्या त्या एल.एल.एम.च्या द्वितीय वर्षाचे शिक्षणही घेत आहेत. त्यांनी या पूर्वी दिल्ली येथे मंत्रालयामध्ये मानव संसाधन आणि विकास या विभागात काम केले आहे. जालन्यात रुजू होण्यापूर्वी त्या नंदूरबार येथे साहाय्यक जिल्हाधिकारी तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत होत्या. मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून हा पहिलाच पदभार आहे. जिल्हा परिषदेच्या कामाचा अनुभव आपल्यासाठी नवीन असला तरी सध्या सुरू असलेली कामे विविध विभागातील अधिका-यांच्या समन्वयाने अधिक चांगल्या पद्धतीने, कशी करता येईल याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अरोरा म्हणाल्या, प्रशासकीय कामकाजांचा जलद गतीने निपटारा करण्यास प्राधान्य देऊन प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी विभागनिहाय बैठक घेणार आहोत. त्याचबरोबर आगामी काळात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी जिल्ह्यात काही नवीन संकल्पना राबवता येतील, का याचाही विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मंगळवारी सकाळी पदभार घेतल्यानंतर त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, जि.प. सदस्य जयमलंग जाधव, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे आदींनी त्यांचे स्वागत केले.
----------
रिक्त पदांचे आव्हान....
जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, सिंचन इ. सर्वच विभागांमध्ये सध्या वर्ग एकपासून वर्ग चारपर्यंतची अनेक पदे रिक्त आहेत. प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी रिक्त पदे भरणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा यांना वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा लागणार आहे. शिवाय जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व विरोधकांच्या राजकारणामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. राजकीय स्थितीला कौशल्याने हाताळण्याचे आव्हान नूतन मुख्य कार्यकारी अधिकाºयांसमोर आहे.
--------------
आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा
पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा परिषद सभागृहात आरोग्य विभागातील अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेतली. आरोग्य सुविधा ही आवश्यक सुविधा असल्याने प्रत्येकाने चांगले काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राष्ट्रीय जंत नाशक कार्यक्रमाची त्यांनी माहिती घेतली. तसेच विभागातील कर्मचा-यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे रावसाहेब शेळके यांची या वेळी उपस्थिती होती.

Web Title: Speeding up the administrative work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.