अध्यात्म हाच सुखी जीवन जगण्याचा पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:56 AM2018-12-11T00:56:21+5:302018-12-11T00:56:50+5:30
आज टीव्हीसह मोबाईलच्या आक्रमणाने घराघरात एक प्रकारचे चित्रपटगृह झाले आहे. हे कुठे तरी थांबवायचे असेल तर त्याला अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामप्रसाद साळुंके यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अध्यात्म हाच जीवनाचा पाया आहे. हजारो वर्षापूर्वी ज्यावेळी मंदिरे नव्हती, त्यवेळी घर हे एक मंदिर होते. मात्र कालांतराने स्वार्थ आणि परमार्थात दरी वाढत गेल्याने कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढत गेले. त्यातूनच मंदिरांची निर्मिती झाली. मंदिरात जाताना आपण षडरिपू बाजूला ठेवूनच जाणे अपेक्षित असते, मात्र आपण कुठली ना कुठली इच्छापूर्ती व्हावी म्हणून देव-देव करत असू तर ते अध्यात्म नाही.
आज टीव्हीसह मोबाईलच्या आक्रमणाने घराघरात एक प्रकारचे चित्रपटगृह झाले आहे. हे कुठे तरी थांबवायचे असेल तर त्याला अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामप्रसाद साळुंके यांनी केले.
चेतना ज्येष्ठ नागरिक संस्थेकडून रविवारी साळुंके यांच्या विशेष व्याख्यानोच आयोजन केले होते. यावेळी महेंद्रकुमार गुप्ता, सुभाष देविदान, अशोक हुरगट, अॅड. सीताराम धन्नावत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. साळुंके यांचा परिचय झंवर यांनी करून दिला. यावेळी पुढे बोलताना त्यांनी हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे सांगितले.
भगवद् गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे सांगतानाच त्यांनी त्यात जे कौरव आणि पांडवांचे जे युध्द दर्शविले आहे, त्यात तथ्य नसल्याचे सांगून ते महाभारताच्या माध्यमातून त्यात आले आहे. श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली म्हणजे याचा अर्थ असा नसून, ती एकट्या अर्जुनाला सांगितली.
अर्जुन या शब्दाचा अर्थ च मुळात आत्मसात करणारा असा आहे.
एकूणच महाराष्ट्रात संतांनी जो भक्ती मार्ग दाखवला आहे, त्या वाटेवर आपण चालल्यास मिळालेले जीवन सार्थकी लागू शकते.
आपल्यातील अहंकार आणि स्वार्थ बाजूला ठेवल्या निखळ आनंदी जीवन जगता येते. संसाररूपी रहाटगाडग्यात आपण केव्हा वयस्कर होतो, हे कळत नाही.
किमान आता ज्येष्ठ नागरिक झाल्यावर आपण जबाबदारीतून मुक्त होऊन ईश्वराचे चिंतनात वेळ घालविण्याचे आवाहन साळुंके यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक हुरगट यांनी केले.