उदयोन्मुख मल्लांना आवश्यक असणारे प्रायोजक ‘स्टार’ झाल्यानंतरच मिळतात : रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:02 AM2018-12-22T01:02:21+5:302018-12-22T01:02:58+5:30

प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणा-या प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडूंनाच त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता असते, असे मत व्यक्त केले आहे ते रुस्तुम-ए-हिंद व महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी अमोल बुचडे याने.

The sponsors who are required by the emerging winners get only after becoming 'Star | उदयोन्मुख मल्लांना आवश्यक असणारे प्रायोजक ‘स्टार’ झाल्यानंतरच मिळतात : रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे

उदयोन्मुख मल्लांना आवश्यक असणारे प्रायोजक ‘स्टार’ झाल्यानंतरच मिळतात : रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटवला तरच खेळाडूंना प्रायोजक मिळतात; परंतु खऱ्या अर्थाने प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणा-या प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडूंनाच त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता असते, असे मत व्यक्त केले आहे ते रुस्तुम-ए-हिंद व महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी अमोल बुचडे याने.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडविण्यासाठी १0 वर्षांपुढील प्रतिभावान खेळाडूंच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी प्रदीर्घ आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे अमोल बुचडे यांना वाटते.
अमोल बुचडे याने २0१0 साली पंजाबच्या जरखड येथे रुस्तुम-ए-हिंदचा किताब पटकावला होता. तसेच याच वर्षी तो बारामती येथे महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला होता. जालना येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त तो येथे आला आहे. या वेळी त्याने लोकमतशी विशेष संवाद साधला.
प्रत्येकाची आंतरराष्ट्रीय
पातळीवर प्रतिनिधित्वाची इच्छा
महाराष्ट्रातील बरेच पहिलवान महाराष्ट्र केसरी किताब पटकावले की त्यावरच ब-याचदा समाधान मानतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याविषयी त्यांच्या मनात विचार येत नाही याविषयी छेडले असता तो म्हणाला, ‘‘आर्थिक स्थिती प्रतिकूल असणे, खेळण्यासाठी पोषक वातावरण नसणे आणि कौटुंबिक अडचण अथवा दुखापतीमुळे अनेक मल्लांना महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर खेळ थांबवण्यास भाग पडते. त्याचप्रमाणे एकदा महाराष्ट्र केसरी झाला की त्याच दर्जाची कामगिरी व्हायला पाहिजे ही मल्लाची इच्छा असते. फक्त महाराष्ट्र केसरी किताबावरच थांबण्याची त्याची स्वत:ची तशी कधीही वैयक्तिक इच्छा नसते. प्रत्येकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते. आता ट्रेंड बदलत आहे. आता मल्ल फक्त एकदाच महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यावर समाधान मानत नाही. त्यांचे ध्येय हे तीनदा महाराष्ट्र केसरी होण्याचे आहे. मीदेखील महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर खेळलो.
महाराष्ट्राला आॅलिम्पिकमध्ये मेडल मिळेल
खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला आॅलिम्पिक मेडल मिळविण्याची धमक गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पधेर्तील सुवर्णपदक विजेता राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे यांच्यात असल्याचेही अमोल बुचडे याने आवर्जून सांगितले.
उदयोन्मुख खेळाडूंना
प्रायोजक मिळावेत
खेळाडूंना योग्य वयात स्पॉन्सर्स मिळत नसल्याची खंतही अमोल बुचडे याला वाटते. तो म्हणाला, ‘‘एक दर्जेदार पहिलवान घडवण्यासाठी खूप आर्थिक खर्च असतो. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील पहिलवानांच्या खुराकासाठी किमान १ लाख व राज्य पातळीवरील पहिलवानांसाठी ५0 हजार व सर्वसाधारण पहिलवानांसाठी २५ हजार रुपयांचा खर्च लागतो. त्यामुळे ख-या अर्थाने प्रायोजकाचे साह्य पहिलवानांना आवश्यक असते; परंतु पहिलवान मोठा झाल्यानंतरच त्याला प्रायोजकत्व मिळते. वास्तविकत: उदयोन्मुख प्रतिभावान मल्लाच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी व त्यांचे बेसिक पक्के करण्यासाठी प्रायोजकाची गरज असते. तज्ज्ञ व मार्गदर्शकांचा सल्ला घेऊनच त्या खेळाडूला प्रायोजकत्व द्यायला हवे. मीदेखील माझ्या अकॅडमीत उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले आहे,’’ असे अमोलने सांगितले.

Web Title: The sponsors who are required by the emerging winners get only after becoming 'Star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.