प्रत्येक प्रभागात जंतूनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:15 PM2020-03-26T23:15:36+5:302020-03-26T23:15:59+5:30
शहरातील प्रत्येक प्रभागात जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जालना नगर पालिकेने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.शहरातील प्रत्येक प्रभागात जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जालना नगर परिषद प्रशासनाने आवश्यक ती पावलं उचलली आहेत. जालना शहर व जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. असे असले तरी या आजाराची लागण झाल्यास तो झपाट्याने फोफावतो ही बाब लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनातर्फे शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वत: मोहिमेबरोबरच प्रत्येक प्रभागात आणि प्रभागातील प्रत्येक भागात नगर परिषदेतर्फे छोट्या ट्रॅक्टरद्वारे जंतूनाशक फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या फवारणीच्या संदर्भात त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांनी जाणीवपूर्वक लक्ष ठेऊन प्रत्येक ठिकाणी फवारणी करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. शहरातील नागरिकांनी देखील कोरोनाला पराभूत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले आहे.