लाल परी बनली पोलादी ! विभागात ९ बसेस दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:41 AM2019-02-11T00:41:00+5:302019-02-11T00:41:21+5:30
बदल स्वीकारून एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अॅल्युमिनियम बस ऐवजी माईल्ड स्टीलच्या बस बांधणी करण्याला सुरूवात केली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : काळानुरूप कोणत्याही वस्तूत बदल होणे गरजेचे आहे. तरच ती वस्तू स्पर्धेत तग धरू शकते. हाच बदल स्वीकारून एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अॅल्युमिनियम बस ऐवजी माईल्ड स्टीलच्या बस बांधणी करण्याला सुरूवात केली आहे. ८ फेबु्वारीपर्यंत या स्टील बॉडीच्या ९ बसेस जालना विभागात दाखल झाल्या आहेत. अशी माहिती विभाग नियंत्रक यू. बी. वावरे यांनी दिली आहे.
खाजगी टॅÑव्हल्सच्या तोडीत- तोड देण्यासाठी व प्रवाशांना प्रवासात सुविधा मिळाव्यात, यासाठी माईल्ड स्टीलच्या बसेसची बांधणी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथील एस. टी महामंडळाच्या कार्यशाळेत करण्यात येत आहे. या कार्यशाळेतून ८ फेब्रुवारीपर्यंत जालना आगाराला- ५, जाफराबाद- २ व अंबड आगाराला -२ अशा एकूण ९ बस जालना विभागात दाखल झाल्या आहेत. सद्य स्थितीत या विभागात एकूण २५० बस आहेत.
खाजगी ट्रॅव्हल्सधारक प्रवाशांना अधिक सुविधा देत आहेत. यामुळे हल्ली प्रवासी दूरच्या प्रवासाला खाजगी ट्रॅव्हल्सलाच अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या आदेशानुसार अत्याधुनिक सुविधा युक्त असलेल्या स्टील बॉडीच्या बस बनविण्यात येत आहेत. या बसचा प्रवास प्रवाशांसाठी सुरक्षित आहे. त्यामुळे प्रवाशांनी याच बसने प्रवास करावा, असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे.
या स्टील बॉडी बसचा लूक लक्झरी व शिवशाहीप्रमाणेच दिसत आहे. यामुळे ही बस दूरवर दिसताच प्रवाशांनी ती शिवशाही, लक्झरी असल्याचा अनेकदा भास होत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बस सुविधायुक्त आहे. तसेच बसचा स्टीलचा पत्रा असल्यामुळे प्रवाशांसाठी या बसचा प्रवास सुरक्षित आहे.
प्रवाशांचा बसचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी महामंडळाने माईल्ड स्टीलचा वापर करून बसची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्टील बॉडीच्या बसची बांधणी खाजगी बसला नजरेसमोर ठेवून करण्यात येत असल्याने आरामदायक आसन व्यवस्थेसह इतर सुविधा या बसमध्ये देण्यात येत आहेत.
अशी होते बांधणी
अॅल्युमिनीअम बस दुरूस्तीवर आल्यास त्या कार्यशाळेत पाठविल्या जातात. तिथे त्या बसचा झालेला वेग व बॉडीची पाहणी केली जाते. जर बसच्या बॉडीची अवस्था खराब असेल, तर नव्याने ती बस स्टील बॉडीची बनविली जाते.
काही दिवसांपूर्वी १० बसेस विभागातून कार्यशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येणा-या काळात अजून १० स्टील बॉडीच्या बस नव्याने येऊ शकतात. या सर्वच बस जालना- औरंगाबाद रस्त्यावर विना वाहक सोडण्याचा आमचा विचार सुरू आहे. अशी माहिती जालना आगारप्रमुख पंडित चव्हाण यांनी दिली आहे.