तेलगी प्रकरणानंतर २० वर्षांपासून धूळखात पडलेले ३२ कोटी ६८ लाखांचे मुद्रांक नष्ट
By शिवाजी कदम | Published: December 25, 2023 12:18 PM2023-12-25T12:18:43+5:302023-12-25T12:19:43+5:30
तेलगी घोटाळ्यानंतर १०० आणि ५०० रुपयांच्या वर असलेले मुद्रांक रोखण्यात आले होते.
जालना : मुद्रांक शुल्क घोटाळा २००३ मध्ये उघड झाल्यानंतर तत्कालीन सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मुद्रांक सील करण्याचा आदेश दिला होता. आता वीस वर्षांनंतर सील केलेले मुद्रांक नष्ट करण्याचा आदेश मागील महिन्यात राज्य सरकारने सर्व जिल्हा प्रशासनास दिले होते. या आदेशानंतर जालना जिल्ह्यातील ३२ कोटी ६८ लाख रुपये दर्शनी मूल्य असलेले ८९ हजार मुद्रांक बुधवारी नष्ट करण्यात आले आहेत.
वीस वर्षांपूर्वी राज्यात अब्दुल करीम तेलगी याने मुद्रांक घोटाळा केल्याचे उघड झाले होते. घोटाळ्यानंतर शासनाने कोषागारातील शिल्लक असलेले विनाक्रमांकाचे स्टॅम्प पेपर विक्री न करण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून विविध जिल्ह्यांतील कोषागार कार्यालयात सील केलेले मुद्रांक धूळ खात पडून होते. या घोटाळ्यानंतर प्रत्येक मुद्रांकाला क्रमांक देण्यात येत आहेत, तसेच मुद्रांकाचे डिझाइनही पालटण्यात आले आहे.
राज्य सरकारचा आदेश
वीस वर्षांपासून पडून असलेले मुद्रांक नष्ट करण्याचा आदेश यावर्षी १५ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने दिला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत विशेष समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मुद्रांक नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मोठ्या रकमेचे मुद्रांक राेखले
तेलगी घोटाळ्यानंतर १०० आणि ५०० रुपयांच्या वर असलेले मुद्रांक रोखण्यात आले होते. यात एक हजार, पाच हजार आणि १० हजारांच्या मुद्रांकांचा समावेश होता. मुद्रांक विक्री थांबवल्याचा आदेश तत्कालीन सरकारने दिल्यानंतर मोठ्या रकमेचे बाँड सील करण्यात आले होते.
राज्य शासनाकडून सील केलेले मुद्रांक नष्ट करण्याचा आदेश देण्यात आला होता. यानुसार, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बुधवारी नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
- श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना