आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:40 AM2019-09-27T00:40:59+5:302019-09-27T00:41:18+5:30
विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेस खऱ्या अर्थाने शुक्रवारपासून सुरूवात होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेस खऱ्या अर्थाने शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. २७ सप्टेबर ते ४ आक्टोबर या दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर जालना, बदनापूर, घनसावंगी, परतूर आणि भोकरदन येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरता येणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
जालना विधानसभेसाठी पोलीस मुख्यालयाजवळील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. आजपासून जरी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ केला असला तरी प्रत्यक्षात बहुतांश उमेदवार हे नवरात्रोत्सव सुरू झाल्यावर उमेदवारी दाखल करतील असे सांगण्यात येते. पाचही विधानसभेसाठी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, ते सर्वांसाठी मोफत आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम ही दहा हजार रूपये ठेवली असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच हजार रूपयांची अनामत रक्कम भरावी लागणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयाळे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच सर्व सूचना दिल्या आहेत.