कोणत्याच तालुक्यात नसलेल्या तळेगाववाडीच्या समस्यांची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल

By विजय मुंडे  | Published: June 27, 2023 08:50 PM2023-06-27T20:50:36+5:302023-06-27T20:51:02+5:30

शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने तळेगाव वाडीतील ग्रामस्थांनी गावाला "स्वतंत्र राष्ट्र" म्हणून घोषित करण्याची केली होती

State Human Rights Commission takes cognizance of the problems of Talegaonwadi which is not in any taluka | कोणत्याच तालुक्यात नसलेल्या तळेगाववाडीच्या समस्यांची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल

कोणत्याच तालुक्यात नसलेल्या तळेगाववाडीच्या समस्यांची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल

googlenewsNext

- फकिरा देशमुख
भोकरदन :
तालुक्यातील तळेगाव हे गाव दहा वर्षांपूर्वी फुलंब्री (जि.छत्रपती संभाजीनगर) मध्ये समाविष्ट झाले हाेते. परंतु, ग्रुप ग्रामपंचायतीतील तळेगाववाडी हे गाव भोकरदन आणि फुलंब्री तालुक्यातील महसूल विभागातून वगळण्यात आल्याने या गावातील नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहत होते. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली असून, आयोगाच्या निर्देशानुसार भोकरदन येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील महसूलचे पथक मंगळवारी तळेगाव वाडी गावात चौकशीसाठी गेले होते.

शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने तळेगाव वाडीतील ग्रामस्थांनी गावाला "स्वतंत्र राष्ट्र" म्हणून घोषित करण्याची मागणी राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे करीत मंगळवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. राज्य मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार सारिका कदम, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर यांची समिती गठीत करून तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मंगळवारी हे पथक तळेगाव वाडी गावात दाखल झाले. त्यांनी ग्रामसभा घेऊन नागरिकांची मागणी, समस्या जाणून घेतल्या. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. यावेळी फुलंब्रीचे नायब तहसीलदार अशोक कापसे, तलाठी आर.के.औताडे, ग्रामसेवक राजन हनवते व इतरांची उपस्थिती होती.

संभाजीनगर मध्येच समावेश करा
यावेळी आरेफ पठाण, स्माईल पठाण, सादेक पठाण, मुनिरखा पठाण, भुरेखा पठाण, माजितखा पठाण, रशीदखा पठाण आदींनी आमच्या तळेगाव वाडी-बिस्मिल्ला वाडी गावाचा समावेश फुलंब्री तालुक्यात (जि. संभाजीनगर) करावा, अशी मागणी समिती समोर केली.

गेवराई पायगाच्या सरपंचांचे उपोषण मागे
तळेगाव वाडी गावातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, या मागणीसाठी गेवराई पायगाचे सरपंच गणेश साबळे यांनी उपोषण सुरू केले होते. सरपंच साबळे यांनी अर्धनग्न होत, तोंडाला काळे लावून तळेगाववाडी ते तळेगाव असे बैलगाडीतून प्रवास करीत गांधीगिरी केली. फुलंब्री महसूल विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

लोकमतच्या वृत्ताची दखल
तळेगाव वाडी गावातील समस्यांबाबत लोकमतने फुलंब्री येथून एक गाव दोन जिल्हयात, घर का ना घाट का या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतली आहे. त्यानुसार जालना व छत्रपती संभाजीनगरचे महसूल पथक कामाला लागले आहे.

Web Title: State Human Rights Commission takes cognizance of the problems of Talegaonwadi which is not in any taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.