सारवाडी शाळेची राज्यस्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:11 AM2020-02-07T01:11:42+5:302020-02-07T01:12:26+5:30
सारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने हिंगोली येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात निर्धूर चूल हा प्रयोग सादर केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील सारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने हिंगोली येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात निर्धूर चूल हा प्रयोग सादर केला होता. या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
सारवाडी शाळेतील शिक्षक अनंतकुमार शिलवंत यांनी आश्विनी बळीराम कावळे या ७ वी वर्गातील विद्यार्थीनीस निर्धूर चूली प्रयोग तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले होते. हा प्रयोग हिंगोली येथील प्रदर्शनात मांडण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. कमी खर्चात तयारी होणारी निर्धूर चूल ही गॅसला देशी पर्याय म्हणून वापरता येऊ शकते. याला इंधनही कमी लागते, हे यातून मांडण्यात आले होते. या प्रयोगाची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. प्रयोगासाठी चक्रधर बागल यांनी मदत केली. या यशाबद्दल आश्विनी कावळे व शिक्षकांचे मुख्याध्यापिका लता चव्हाण, ज्ञानेश्वर गिराम, विश्वलता गायकवाड, दीपा उंचेकर आदींनी कौतुक केले.