प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या घरात साप सोडू, बंगल्याची सुरक्षा वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 04:40 PM2018-08-05T16:40:02+5:302018-08-05T16:47:14+5:30
पंढरपूरच्या वारीत आषाढी एकादशीदिनी काही समाजकंटकांकडून साप सोडण्यात येणार असल्याची माहिती असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
जालना - पंढरपूरच्या वारीत आषाढी एकादशीदिनी काही समाजकंटकांकडून साप सोडण्यात येणार असल्याची माहिती असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे मराठा आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता, त्याच विधानाचा संदर्भ घेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील घरात साप सोडण्याचा इशार देण्यात आला आहे. त्यानंतर, दानवेंच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील बसपच्या कार्यकर्त्यांनी हा इशारा दिला आहे.
मराठा नेते असलेल्या रावसाहेब दानवेंनी गेल्या 20 वर्षात मराठा समाजासाठी काय योगदान दिलं, असा सवाल बहुजन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारला. जालना शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोन सुरु आहे. या आंदोलनास येथील बसपच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. त्यानंतर, दानवे यांच्या घरात साप सोडण्याची भाषा बसपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्यामुळे दानवेंच्या घराबाहेर 10 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, सकल मराठा समाजाकडून राज्यभर आंदोलन सुरुच आहे. आजही राज्यात दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. तर वाशिममध्ये मराठा आंदोलकांनी मुंडन आंदोलन करुन सरकारचा निषेध नोंदवला.