पोलीस अधीक्षकांच्या घरीच चोरी; चंदनचोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:53 AM2018-09-06T00:53:01+5:302018-09-06T00:53:23+5:30
यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकांच्या निवास्थानाच्या परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी करून फरार झालेल्या चंदनतस्कराला भोकरदन पोलीसांनी अटक केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकांच्या निवास्थानाच्या परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी करून फरार झालेल्या चंदनतस्कराला भोकरदन पोलीसांनी अटक केली आहे़
यवतमाळचे पोलीस अधीक्षक एम़ राजकुमार यांच्या शासकीय निवास्थानातुन २ सप्टेंबरच्या मध्यरात्री चंदनतस्करांनी दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेली होती. त्यामुळे पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे या चोरट्यांचा तपास लावण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पूर्ण पोलीस अधिकाऱ्यांनी चक्रे फिरवली होती. सदर आरोपी हे सी़सी़टी़व्ही फुटेजमध्ये दिसून आल्यामुळे यवतमाळ पोलिसांनी या ठिकाणचे मोबाईल लोकेशनच्या आधारे दोन दिवसापासून भोकरदन तालुक्यातील कठोरा बजार येथे तळ ठोकला होता. मात्र, त्यांच्या हाती आरोपी लागले नाही. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, पोलीस कर्मचारी शेख आसेफ, गणेश पायघन, यांनी सापळा रचून या चंदन चोरीतील संशयित आरोपींना पकडून त्याला खाक्या दाखवताच त्याने आपण पोलीस अधीक्षकांच्या घराच्या परिसरातील दोन चंदनाच्या झाडाची चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. आपल्यासोबत अन्य साथीदार असल्याचेही त्याने सांगितले.
पोलिसांचे पथक भोकरदन परिसरात तळ ठोकून बसलेले आहेत. या बाबत यवतमाळचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंनत कुलकर्णी यांनी सांगितले की, या चोरट्यांनी दोन महिन्यांपूर्वी येथील सर्वच वरिष्ठ अधिकाºयांच्या बंगल्याची रेकी केल्याचे फुटेज मिळाले असून त्या अधारे मिळालेल्या माहिती वरून आमचे कर्मचारी भोकरदन येथे ठाण मांडून आहेत एकाला पकडण्यात आले असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.