हुश्श रेमडेसिविरसह दोन्ही लसींचा साठा अखेर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:32 AM2021-05-06T04:32:12+5:302021-05-06T04:32:12+5:30
जालना : गेल्या काही आठवड्यांपासून लसींच्या प्रतीक्षेत असलेल्या जालनेकरांना कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन लसींचा मोजकाच साठा उपलब्ध झाला असून, तो ...
जालना : गेल्या काही आठवड्यांपासून लसींच्या प्रतीक्षेत असलेल्या जालनेकरांना कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन लसींचा मोजकाच साठा उपलब्ध झाला असून, तो वेगवेगळ्या वयोगटांसाठी विभागून देण्यात आला आहे. जिल्ह्यात लसींअभावी लसीकरण मोहीम केवळ नावालाच सुरु आहे. आधी ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत होती. त्यामुळे ज्यांनी पहिला डोस घेतला, त्या नागरिकांना आता दुसरा डोस मिळण्यास अडचण येत आहे. तर आता राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठीचे नियोजन केले आहे. परंतु, यासाठी लस मिळवताना अडचण येत आहे. बुधवारी कोविशिल्डचे १८ हजार ५०० डोस हे ४५पेक्षा अधिक वय असलेल्यांसाठी मिळाले आहेत.
तर याच कंपनीची १८ हजार लस ही १८ ते ४४ वयोगटासाठी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे साडेसात हजार लस ही कोव्हॅक्सिनची आली असून, तीदेखील १८ ते ४४ वयोगटासाठी तसेच त्यातील काही डोस हे दुसरा डोस घेणाऱ्यांना मिळू शकतील, असे सांगण्यात आले. परंतु, याबाबत अद्याप स्पष्ट सूचना आल्या नसल्याचेही सांगण्यात आले.
चौकट
जालन्यात एक हजार रेमडेसिविर प्राप्त
जालना जिल्ह्यात मंगळवारी एकही रेमडेसिविरचे इंजेक्शन नव्हते. यामुळे रूग्ण आणि नातेवाईक हवालदिल झाले होते. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करताच बुधवारी जवळपास एक हजार रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या उपायुक्त अंजली मिटकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.