चोरीस गेलेले बैल एकाच दिवसात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:55 AM2019-10-18T00:55:36+5:302019-10-18T00:55:59+5:30
मांजरगाव शिवारातून १६ आॅक्टोबर रोजी चोरीस गेलेले दोन बैल पकडण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील मांजरगाव शिवारातून १६ आॅक्टोबर रोजी चोरीस गेलेले दोन बैल पकडण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तालुक्यातील मांजरगाव शिवारातील सुभाष आहिलाजी आरसूळ यांच्या शेतातील गोठ्यातून ६० हजार रूपये किमतीचे दोन बैल १६ आॅक्टोबर रोजी रात्री चोरीला गेले होते. आरसूळ यांनी नातेवाईकांसमवेत बैलांचा शोध सुरू केला. त्यावेळी रोषणगाव शिवारातील एका पडीक असलेल्या शेतातील एका खोलीत काळ्या रंगाचा त्यांचा बैल त्यांना आढळून आला़ दुसरा पांढऱ्या रंगाचा बैल आढळून आला नाही. त्यामुळे सुभाष आरसूळ यांनी बदनापूर पोलीस ठाणे गाठले. करमाड पोलीस ठाणे हद्दीत सटाणा फाटा येथे एक लोडींग रिक्षामध्ये एक पांढºया रंगाचा बैल पकडला असून, त्याची खात्री करून घ्या असे पोलिसांनी सांगितले. आरसूळ यांनी करमाड पोलीस ठाण्यात जाऊन खात्री केल्यानंतर तो बैल त्यांचाच असल्याचे समजले. आरसूळ यांच्यासह त्यांचे शेजारी रमेश एकनाथ डमरे (रा ढोकसाळ) यांचे बैलही २२ सप्टेंबर २०१९ चोरीला गेले होते़ या प्रकरणात आरसूळ यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात इब्राहिम मिर्झा महेबूब मिर्झा (रा माणिकनगर औरंगाबाद) व अफरोज खाँ रज्जाक खाँ (रा. संजयनगर बायजीपुरा औरंगाबाद) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला.
भोकरदनमध्ये घरफोडीचा प्रयत्न
भोकरदन : शहरातील देशमुख गल्ली भागातील एका घरात चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. शहरातील देशमुख गल्ली भागातील शिवाजीराव देशमुख व कुटुंबातील सदस्य बुधवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते.
गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी देशमुख यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडल्यानंतर चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे आतील साहित्य अस्ताव्यस्त फेकून चोरट्यांनी पळ काढला. गुरूवारी सकाळी हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र चोरीस काहीच न गेल्याने संबंधितांनी तक्रार दिली नाही.