दगड उत्खनन,५ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:46 AM2018-04-28T00:46:57+5:302018-04-28T00:46:57+5:30
दगडवाडी शिवारात मौल्यवान दगडाचे उत्खनन करणाऱ्या पाच संशयितांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील दगवाडी शिवारात मौल्यवान दगडाचे उत्खनन करणाऱ्या पाच संशयितांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त दगडाची किंमत ३३ लाख रुपये असून, महानगरांमध्ये हा दगड चौपट दराने विकला जातो, अशी माहिती पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी दिली.
गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री दगडवाडी शिवारातील शिवाजी दामोधर कातुरे व रामेश्वर दामोधर कातुरे यांच्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन सुरू असताना छापा टाकून आठ टन ३०० किलोग्रॅम मौल्यवान गारीचा दगड जप्त केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शिवाजी कातुरे, रामेश्वर कातुरे, ज्योतिराम बाबासाहेब माने, शरद मच्छिंद्र कदम, गोपीचंद पंढरीनाथ कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मौल्यवान दगड दागिन्यांमध्ये स्टोन, तसेच शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी वापरण्यात येतो, असे पोलीस अधीक्षक पोकळे यांनी सांगितले.
व्हॉटसअॅपवर ठरतो भाव
औरंगाबाद, सिल्लोड भागात गारीचा दगडाचा व्यवहार करणारे एजंट सक्रिय आहेत. उत्खनन केलेल्या दगडाचे फोटो व्हॉटसअॅपवर पाठवून गुणवत्ता व दगडाचा प्रकार तपासला जातो. दलालामार्फत भाव ठरल्यानंतर चोरी-छुपे हा दगड रात्रीतून पसार केला जातो. याचे धागेदोरे परराज्यासह परदेशात आहे.