दगडी ज्वारी, कुंथलगिरी पेढ्याला जीआय मानांकन
By शिवाजी कदम | Published: June 13, 2023 10:36 AM2023-06-13T10:36:02+5:302023-06-13T10:36:17+5:30
मराठवाड्यातील आठ उत्पादनांना मिळेल नवीन ओळख
शिवाजी कदम, लोकमत न्यूज नेटवर्क, जालना: पैठणीला जीआय टॅग अर्थात भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर मराठवाड्यातील आठ उत्पादनांना जीआय टॅग मिळणार आहे. यामध्ये जालन्याची दगडी ज्वारी, कुंथलगिरी पेढा, तुळजाभवानीची कवडी माळ, श्री रेणुका मातेचे तांबूल पान यांचा समावेश आहे.
काही दिवसांत या उत्पादनांना जिओग्राफिकल इंडिकेश कार्यालयाकडून भौगोलिक मान्यता मिळणार आहे. या उत्पादनांच्या जीआय टॅगिंगला संमती देत असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. दोन दिवसांपूर्वी जीआय कार्यालयाकडून उत्पादकांना पत्र देण्यात आले आहे.
ज्वारीला नवी ओळख
जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील जय किसान शेतकरी गटाने दगडी ज्वारीला जीआय मानांकनासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. मराठवाड्यासह देशात प्रसिद्ध असलेल्या कुंथलगिरी पेढ्यालादेखील तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याचे जीआयतज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.
ही आहेत आठ उत्पादने
भौगोलिक मानांकनाच्या यादीत मराठवाड्यातील आठ उत्पादनांचा समावेश होणार आहे. यामध्ये जालन्यातील दगडी ज्वारी, धाराशिव येथील कुंथलगिरी पेढा, तुळजापुरी कवड्याची माळ, नांदेडमधील माहूरच्या श्री रेणुका मातेचे तांबूल पान, लातूर जिल्ह्यातील पानचिंच, बोरसरी डाळ, कास्ती कोथिंबीर आणि मुरूड अडकित्ता यांचा समावेश आहे.
मागील वर्षी अठरा प्रस्ताव दाखल केले होते. तपासणीनंतर मराठवाड्यातील आठ उत्पादनांना जीआय कार्यालयाने तत्त्वत: मान्यता दिली. काही दिवसांत अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. मान्यतेनंतर वस्तूंचे किंवा पदार्थांचे उत्पादन करण्यासाठी जीआय टॅग असणाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. यामुळे बनावट मालाला आळा बसण्यास मदत होईल. -गणेश हिंगमिरे, जीआयतज्ज्ञ, पुणे.