अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:46 AM2018-07-13T00:46:29+5:302018-07-13T00:46:43+5:30
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी जालना-बीड रोडवर मठपिंपळगाव पाटी येथे घडली. अपघात होताच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतापलेल्या नागरिकांनी दगडफेक केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड / मठपिंपळगाव : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी जालना-बीड रोडवर मठपिंपळगाव पाटी येथे घडली. अपघात होताच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतापलेल्या नागरिकांनी दगडफेक केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
नागरिकांनी झाड, दगड आडवे टाकून रस्ता बंद केल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील संभाव्य अनर्थ टळला.
बुधवारी दीड वाजेच्या सुमारास जालना येथील नूतन वसाहत येथील रहिवासी दिलीप उजाड (६०) हे आपल्या दुचाकीने (एम. एच. २०-ए एक्स ११६०) जालना येथून अंबडकडे येत होते, यावेळी उजाड यांच्यासोबत एक ७ वर्षाचा लहान मुलगाही होता. मठपिंपळगाव पाटी येथे उजाड यांनी ट्रकला (एम. पी. ०९ एच.एफ. ४०६०) ओव्हरटेक केले. मात्र, ओव्हरटेक केल्यानंतर अचानक समोर असलेल्या रस्त्यातील खड्ड्यात उजाड यांची दुचाकी आदळली. खड्डा मोठा असल्याने दुचाकीचा तोल गेला व उजाड आपल्या दुचाकीसह पडल्याने रोडवर लांबपर्यंत घसरत गेले. पाठीमागे असलेल्या ट्रकचालकाने आपला ट्रक थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर पडलेल्या उजाड यांच्या अंगावरुन ट्रकचे पुढचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी होऊन बेशुध्द झाले.
मठपिंपळगाव पाटीवर मोठया संख्येने नागरिकांची गर्दी होती, अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
केवळ नशीब बलवत्तर असल्याने उजाड यांच्यामागे बसलेला मुलगा उजाड यांच्या विरुध्द बाजूला म्हणजे रोडच्या खाली चिखलात पडल्याने बजावला. अपघातामुळे घाबरलेल्या मुलाला आपण कोण आहोत हे नेमके सांगता येत नसल्याने सदरील मुलगा उजाड यांचा कोण आहे हे कळू शकले नाही.