परभणीला पाणी न देण्यासाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:17 AM2019-05-16T01:17:04+5:302019-05-16T01:17:25+5:30
निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडू देणार नसल्याचा निर्धार केलेल्या शेतकरी आणि धरण संघर्ष समितीच्या वतीने रोहीणा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडू देणार नसल्याचा निर्धार केलेल्या शेतकरी आणि धरण संघर्ष समितीच्या वतीने रोहीणा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान रोडवर दोन्ही बाजंूनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे अनेकांचे विवाहमुहूर्त टळल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पात आता केवळ मृत पाणीसाठा आहे. आणि या साठ्यातून परभणीकडे पात्रातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. या पाणी सोडण्याला विरोध म्हणून आता सर्वच पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बुधवारी धरण संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याला विरोध म्हणून रोहिणा पुलावर जलसमाधी आणि रास्ता रोको आंदोलन केले. या दोन तास चालेल्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहने खोळंबली होती. या मध्ये बस व प्रवासी वाहतूक करणारी वाहने होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे रास्ता रोको आंदोलन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भ्रमणध्वनी वरून दिलेल्या आश्वासनांनतर दुपारी १ वाजता मागे घेण्यात आले.
आंदोलना दरम्यान कोंडी झालेल्या वाहनांत प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांचा समावेश होता. यामुळे महिला व मुले घामाघूम झाली होती.
या आंदोलना दरम्यान जि. प. सदस्य राहूल लोणीकर यांनी शेकतरी व आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आंदोलन सोम्य केले. तोपर्यंत रोहिणा पुलावर दुतर्फा वाहनांची मोठी कोंडी झाली होती. शेवटी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या आश्वासनांनतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य राहुल लोणीकर, सभापती रामेश्वर तनपुरे, सुधाकर सातोनकर, सुधाकर बेरगुडे, रमेश चव्हाण, बंडू मानवतकर, प्रकाश गाढेकर, संपत टकले, विठ्ठल बिडवे, किसन राऊत, संदीप बाहेकर, रमेश भापकर, प्रकाश चव्हाण, श्रीकांत उन्मुखे यांच्यासह २० गावातील शेतकरी उपस्थित होते.
मृत जलसाठ्यावर मदार असल्याने परभणीला पाणी नाही : बबनराव लोणीकर
या आंदोलना दरम्यान पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, आमचा पाणी सोडण्याला विरोध नाही, पाण्याच्या नासाडीला विरोध आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यास टँकरने कितीही पाणी न्यावे. जेव्हा पाणी होते तेव्हा दिले. आता धरणातच पाणी नाही. तर ते सोडायचे कसे, असे ते म्हणाले.
केवळ मृतसाठ्यावर भविष्यातील पाणी टंचाईची मदार आहे. सिध्देश्वर धरणातून रहाटी धरणात पाणी साठवण करण्यात आले आहे. १० जून पर्यत पाणी परभणी शहराला पाणी पुरेल, एवढा पाणीसाठा रहाटी धरणात आहे. तसे या अधिकाऱ्यांनीही कळवले आहे.
बॅक वॉटरवरील एकाही शेतक-याची विद्युत मोटार जप्त करण्यात येणार नाही. या बरोबरच परभणीला पाणी सोडण्यात येणार नाही. त्यामुळे हे रास्ता रोको व जलसमाधी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती लोणीकरांनी केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.