राजुरात ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:49 AM2019-07-23T00:49:37+5:302019-07-23T00:50:32+5:30
ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे स्वस्त धान्य दुकानातून खरेदी केलेल्या गव्हात रासायनिक खताचे मिश्रण आढळल्याचा प्रकार राजूर येथे समोर आला. या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
समाजातील गोरगरीब घटकासाठी शासनाकडून स्वस्त धान्य योजना राबवण्यात येते. राजूर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ८९ मध्ये काही शिधापत्रिकाधारकांनी गहू खरेदी केला. खरेदी केलेल्या गव्हामध्ये रासायनिक खताचे मिश्रण असल्याचे आढळून आले आणि शिधापत्रिका धारकांत खळबळ उडाली. शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच गोरगरिबांना निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले होते.
यावेळी तालुकाध्यक्ष बळीराम पुंगळे यांनी स्वस्त धान्य पुरवठादाराची चौकशी करावी, राजूर येथील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी केली. दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनात जि. प. सदस्य कैलास पुंगळे, बळीराम पुंगळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.वैजीनाथ ढोरकुले, विष्णू सानप, जगन पवार, राजू पुंगळे, भरत पुंगळे, गजानन जुंबड, सुधाकर पिंपळे, भागाजी भाडळकर, माधवराव भालेराव, नाना पवार, तुळशीराम जुंबड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.