जायकवाडीतून पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:56 AM2019-03-03T00:56:21+5:302019-03-03T00:56:37+5:30
जायकवाडीच्या डाव्या काळव्यातून अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी दुपारी दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदी / सुखापुरी : जायकवाडीच्या डाव्या काळव्यातून अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी जालना वडीगोद्री राज्य महामार्गावरील शहापूर येथे गल्हाटी संघर्ष समिती व शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी दुपारी दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यंदा बारसवाडा परिसरात अल्प प्रमणात पाऊस पडला आहे. यामुळे हा प्रकल्प मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला असून येथे पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या प्रकल्पावर पाणी असल्यास पंचक्रोशीतील ५० ते ६० हजार नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
तसेच या परिसरात मोठ्या प्रमणात फळबागा आहेत. परंतु, पाण्याअभावी त्या संकटात सापडल्या आहेत. विहिरी व बोअरने तळ गाठला आहे. यामुळे या प्रकल्पात पाणी सोडल्यास याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.
या पूर्वीही संघर्ष समितीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जायकवाडी अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभाग औरंगाबाद यांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत. परंतु, त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याने याचा कोणाताही फायदा झाला नाही. असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू सुरू असल्याने मंडळ अधिकारी दिवाकर जोग्लादेवीकर यांना निवेदन देऊन नागरिकांनी आंदोलन मागे घेतले आहे. यापुढे तातडीने प्रकल्पात पाणी सोडले नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असेही मंडळाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष बंडू माईंद, शेतकरी संघटनेचे नेते सुरेश काळे, पं. स. सदस्य राईज बागवान, शहापूरचे सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
मंगरूळ बंधाºयात पाणी सोडण्यासाठी दोन ठिकाणी उपोषण
तीर्थपुरी : जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून मंगरूळ बंधाºयात तात्काळ पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी सकाळपासून बानेगाव येथील गोदावरी पात्रात, पंचायत समिती सदस्य शीतल उढाण व ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे.
तसेच याच मागणीसाठी सीआर. ८७ कोळतेवाडी परिसरात सर्वपक्षीय शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. मंगरूळ बंधा-यात जायकवाडीच्या डाव्या किंवा उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी दोन्ही ठिकाणी बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
कोळतेवाडी येथे उपोषणाला बसलेल्यांमध्ये रामसगाव, शेवता, जोगलादेवी, लिंगसेवाडी, सौंदलगाव, विठ्ठलनगर, भोगगाव, राहेरी, बोरगाव, बाणेगाव गंगा आदी गावांमधील नागरिकांचा समावेश आहे.