दोष सिध्दतेसाठी कठोर भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:00 AM2020-02-13T01:00:59+5:302020-02-13T01:02:37+5:30
दाखल होणाऱ्या गुन्ह्यांतील दोषसिध्दतेचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षतेने काम करावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी बुधवारी झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दाखल होणाऱ्या गुन्ह्यांतील दोषसिध्दतेचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षतेने काम करावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी बुधवारी झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये दिल्या. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात नियमित गस्त घालावी, रोडरोमिओंना चाप लावावा, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: शिस्तीच्या पोलीस खात्यात कामात कुचराई करणा-यांवर कारवाई केली जाईल, असा सक्तीचा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
सन २०१९ मध्ये दाखल गुन्हे, दोषारोपपत्र आणि गुन्ह्यांची सद्यस्थिती याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सर्वच पोलीस ठाण्याचे कामकाज आणि त्यातील कमतरता दूर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. चालू वर्षात २०२० मध्ये काम करताना पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी दाखल गुन्ह्यांमधील दोषसिध्दता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. न्यायालयात सुरू असलेल्या दैनंदिन कामकाजाची माहिती कोर्ट पैरवी कर्मचा-याकडून घ्यावी, साक्षीदार, वॉरंट, समसन्स आदींची माहिती घेऊन येणा-या अडचणींवर मार्गदर्शन करावे, आदी विविध सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरासह जिल्हाभरात प्रॉपर्टीबाबत दाखल होणा-या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी काम करावे, समन्स, वॉरंटची वेळेत अंमलबजावणी करावी यासह इतर विविध सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या. विशेषत: शिस्तीच्या खात्यात काम करताना कर्तव्यात कसूर करणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही पोलीस अधीक्षकांनी या बैठकीत सूचना दिलेल्या आहेत.
कामकाजाचा आढावा : कामचुकारांवर केली जाणार कारवाई
शहरी, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत पोलीस पथकाने नियमित गस्त घालावी. शिकवणीच्या आवारात गस्त घालून संबंधित शिकवणी चालकांना दक्षतेबाबत सूचना द्याव्यात. तसेच मुले, मुली फिरण्यास जाणा-या पॉइंटवरही लक्ष ठेवण्यास सूचित करण्यात आले.
पोलीस दल हे शिस्तीचे आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर कोणीही करणार नाही, याची अधिका-यांनी दक्षता घ्यावी. पोलीस ठाण्यात कर्तव्यात कसूर करणा-यांचा अहवाल तात्काळ द्यावा. कर्तव्यकसूर करणाºया अधिकारी, कर्मचा-यांना मुख्यालयाशी संलग्न केले जाईल, असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला.