पट्ट्यातील बातम्या -३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:18+5:302021-01-16T04:35:18+5:30
जालना : तालुक्यातील सोमनाथ जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत ...
जालना : तालुक्यातील सोमनाथ जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली, परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अध्यक्षपदी अंबेकर
धावडा : जाळीचा देव येथील संतोष अंबेकर यांची महाराष्ट्र राज्य महानुभाव संरक्षक दलाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख, कार्यकारी अध्यक्ष संतोष धात्रक यांनी केली आहे. या नियुक्तीबद्दल अंबेकर यांचे स्वागत केले जात आहे.
जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री व्यवहार बंद
जालना : जिल्ह्यातील ग्रा.पं. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी, तसेच निवडणूक प्रक्रिया मुक्त व शांततेत पार पडावी, म्हणून जिलाधिऱ्यांनी मुंबई दारूबंदी कायदानुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार सर्व ठोक व किरकोळ देशी, तसेच विदेशी अनुज्ञप्त्यांचे व्यवहार १४, १५, १८ जानेवारी रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
२९ दात्यांचे रक्तदान
तीर्थपुरी : घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २९ जणांनी रक्तदान केले. जालना येथील स्वामी समर्थ ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.
ग्रामस्थांची गैरसोय
जामखेड : गावातील अर्ध्या भागातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. मागील वीस दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. ग्रामस्थांनी नळाचे कोटेशन भरून नळजोडणीही केली, परंतु नळाला पाणी येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गौरव पुरस्कार देण्यासाठी प्रस्ताव मागविले
जालना : राजमाता आईसाहेब गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले असून, इच्छुकांनी २१ जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देवगिरी इंग्लिश स्कूल जालना, देवगिरी विद्या प्रतिष्ठान जालना व कला क्रीडा दूत फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्याचे नाव उंचविणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
ट्रकचे ब्रेक निकामी
राजूर : येथून जवळ असलेल्या चांदई टेपली परिसरात जालन्याकडे जाणाऱ्या एका ट्रकचे गुरुवारी ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत तब्बल तीन किलोमीटर अंतरापर्यंत मागील दिशेने नेत ट्रकवर नियंत्रण ठेवले. ट्रकमधील सहायकाने बाहेर उडी घेत, दुचाकीस्वारांना ब्रेक निकामी झाल्याची माहिती दिली.
तारा बनल्या धोकादायक
जाफराबाद : येथील बसस्थानकामागील नगरपंचायत, आठवडे बाजार तथा किल्ला भागाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील विजेच्या तारा गेल्या अनेक दिवसांपासून लोंबकळलेल्या अवस्थेत असून, धोकादायक ठरत आहेत. महावितरण कंपनीने नवीन पोल बसवून त्यांना ताण द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
संक्रांत उत्साहात
कुंभार पिंपळगाव : संक्रांतीचा सण महिलांनी गुरुवारी उत्साहात साजरा केला. गावातील विविध मंदिरात वाण देण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. गावातील व विठ्ठलनगर भागातील विठ्ठल मंदिरात महिलांची गर्दी झाली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मंदिरात जास्त गर्दी होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात आली होती, तसेच रांगाचे नियोजन करण्यात आले होते.
नामविस्तार दिन साजरा
अंबड : शहरातील मत्स्योदरी महाविद्यालयात गुरूवारी नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. या निमित्त प्राचार्य डॉ.भागवत कटारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्रा.चंद्रसेन कोठावळे, प्रा.डॉ.मिलिंद पंडित, प्रा.डॉ.प्रशांत तौर, पर्यवेक्षक प्रा.पांडुरंग काळे, प्रा.पोपटराव सुरासे, प्रा.शरद खोजे, प्रा.डॉ.दिगंबर भुतेकर, ज्ञानेश्वर उबाळे आदींची उपस्थिती होती.
लोकवर्गणीतून सुशोभीकरण
जालना : जाफराबाद तालुक्यातील तालुक्यातील वरुड बुद्रुक गावचे ग्रामदैवत आई अंबिका माता मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आला. मकर संक्रांतीनिमित्त अनोखा देखावा करण्यात आला होता. मंदिराचे काम अनेक दिवसांपासून लांबणीवर पडले होते. राजू चिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
नामफलकाचे अनावरण
जालना : शहरालगत अंबड चौफुली-राजपूतवाडी परिसरातील नागरिकांनी राजमाता माँ जिजाऊ जयंतीनिमित्त मंगळवारी कॉलनीत जिजाऊनगर नामफलकाचे अनावरण करत, या भागास जिजाऊनगर हे नाव देण्याची मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी धर्मा खिल्लारे, सतीश पवार, दिलीप सोनवणे, दत्तात्रय मेहेत्रे, संजय खांडेभराड आदी उपस्थित होते.