पट्ट्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:41 AM2020-12-30T04:41:39+5:302020-12-30T04:41:39+5:30
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील सुखापुरी फाटा ते तीर्थपुरी रस्त्याच्या कामास नुकताच प्रारंभ झाला आहे. मागील काही दिवसांपासून सुखापुरी फाटा ...
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील सुखापुरी फाटा ते तीर्थपुरी रस्त्याच्या कामास नुकताच प्रारंभ झाला आहे. मागील काही दिवसांपासून सुखापुरी फाटा ते तीर्थपुरी या पाच किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढली होती. त्यामुळे अनेकदा वाहनधारकांना समोरून आलेले वाहन जवळ येईपर्यंत दिसत नव्हते. परिणामी अनेकदा किरकोळ अपघात घडत होते. यावर मार्ग काढण्यासाठी सदरील रस्त्याचे काम करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून होत होती. या मागणीची दखल घेऊन मागील काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे; परंतु कामात दर्जा राखण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
-----------
जिल्हाध्यक्षपदी दिनेश खरात यांची नियुक्ती
जालना : बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या वकील आघाडी जिल्हाध्यक्षपदी दिनेश खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्टीच्या संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष मिलिंद बोर्डे यांनी अॅड. खरात यांना नियुक्तीपत्र दिले आहे. याबद्दल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल मोसिन पटेल, राखसिंग जुनी, निकेतन बोर्डे, विल्सन वाघमारे, रवी वाडेकर, सुमित सपकाळ, शेख शफी शेख मिया आदींनी खरात यांचे स्वागत केले आहे.
----------
भाज्यांचे दर घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त
भोकरदन : गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे भाजीपाला पिकविण्यासाठी झालेला खर्चही वसूल होत नसल्याची माहिती भाजीपाला उत्पादकांमधून दिली जात आहे. सध्या वांगे दहा रुपये किलो, मिरची २० रुपये, टोमॅटो १० रुपये, कोथिंबीर १० रुपयांमध्ये पाच जुड्या, कांदे २० ते ४० रुपये किलो, फुलकोबी दहा ते पंधरा रुपये तर पत्ताकोबी दहा ते बारा रुपये किलो असा भाव येथील आठवडी बाजारात होता.