पट्ट्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:50+5:302020-12-31T04:29:50+5:30
भोकरदन : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, उमेदवारांसह समर्थकांनी मंगळवारी व बुधवारी तहसील कार्यालय परिसरात अर्ज भरण्यासाठी गर्दी ...
भोकरदन : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, उमेदवारांसह समर्थकांनी मंगळवारी व बुधवारी तहसील कार्यालय परिसरात अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला होता. दरम्यान उमेदवारांना विविध अडचणींचाही सामना करावा लागला.
गाव, खेड्यांमध्ये मतदारांचा रूबाब वाढला
जालना : मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रत्यक्ष अनेक उमेदवारांनी अर्ज भरले असून, आता मतदारांनी हाॅटेल, ढाबे हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून येत आहे. मतदारांनी मतदान आपल्यालाच करावे, यासाठी उमेदवार मतदारांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय मतदारांच्या भेटी- गाठीवरही भर दिला जात आहे.
राजूर रस्त्यावर जागोजागी खड्डे
जालना : जालना ते राजूर या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रात्री- अपरात्री वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रस्त्यावर किरकोळ अपघात घडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वेळीच सदरील रस्त्याची संबंधित विभागाने दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
स्वच्छतेची मागणी
जालना : जुना जालना भागातील बाजार गल्ली परिसरात मागील काही दिवसांपासून अस्वच्छता पसरलेली आहे. रस्त्यालगतच्या सांडपाण्याच्या नाल्याही काही ठिकाणी तुंबल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी सुटली असून, वेळीच नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
तळीरामांचा वावर
जालना : शहरातील मुख्य असलेल्या आझाद मैदान परिसरात रात्रीच्या वेळी तळीरामांचा वावर वाढला आहे. अनेक जण रात्री मद्य विक्रीच्या दुकानातून मद्य खरेदी करून प्रेक्षक गॅलरीच्या पायऱ्यांवर बसून मद्य प्राशन करतात. यानंतर रिकाम्या काचेच्या बाटल्या तेथेच टाकून देतात. तर काही जण बाटल्या फोडून टाकतात.
वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी आलेल्या तीन ट्रॅक्टरवर गोंदी पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत १५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर मालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्यासह पथकाने केली आहे.
साड्यांचे वाटप
जालना : ख्रिसमस (नाताळ) सणानिमित्त जालना शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. क्राईस्ट चर्चच्यावतीने विधवा महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी खेड्यातील २० ते ३० अशा १५० गरजू महिलांना या साड्यांचे वाटप करण्यात आले. मिशन हॉस्पिटल जवळील चर्चमध्ये हा कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. यावेळी एम. डी. जाधव, आर. आर. सोज्वळ आदींची उपस्थिती होती.
अवैध वृक्षतोड
जालना : शहर परिसरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध वृक्षतोड वाढली आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे अनेक जण कुठलीही परवानगी न घेता झाडांवर कुऱ्हाड चालवित आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. वेळीच वन विभागाने विशेष मोहीम राबवून वृक्ष तोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून होत आहे.
... तर अपघात टळतील
जालना : सध्या उसाची वाहतूक टायर गाड्यांसह इतर वाहनांमधून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु, अनेक टायर गाड्यांना रिफ्लेक्टर नसल्याने अपघात घडत आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावावेत, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. तसेच जी अपघात स्थळे आहेत, अशा ठिकाणी बोर्ड लावण्याचे त्यांनी सांगितले.
अंनिसचे अभियान
जालना : थर्टी फस्टला युवकांनी दारू पिऊन व फटाके फोडून नव वर्षाचे स्वागत न करता दूध सेवन करून नव वर्षाचे स्वागत करावे, यासाठी चला व्यसनाला बदनाम करू या, हे अभियान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा जालनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. दरवर्षी युवक मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन करून थर्टी फस्ट साजरा करीत असतात. यात शारीरिक हानी मोठ्या प्रमाणात होत असते.
चौकात अतिक्रमण
भोकरदन : शहरातील सिल्लोड- भोकरदन महामार्गावरील महात्मा फुले चौकात झालेले अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. महात्मा फुले चौक हा मुख्य मार्गावरील चौक आहे. असे असतानाही नियोजित जागेपासून मुख्य मार्गापर्यंत अनेक नागरिकांनी अतिक्रमण केलेले आहे. निवेदनावर राजेंद्र दारूटे, रमेश जाधव, विलास शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बसची मागणी
कुंभार पिंपळगाव : मागील काही दिवसांपासून नववी ते बारावी दरम्यानचे असलेले वर्ग सुरू झाले आहेत. परंतु, खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना अनेकदा वेळेवर बस लागत नाही. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना खासजी वाहनाने अव्वाच्या- सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागतो. यावर उपाय म्हणून वेळीच मानव विकासच्या बसेस घनसावंगी तालुक्यातील विविध मार्गांवर सुरू कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.