पट्ट्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:51+5:302021-01-18T04:27:51+5:30
जालना : जुना मोंढा परिसरातील मोकळ्या जागेत मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी तळीरामांचा वावर वाढला आहे. यावेळी एकमेकांमध्ये ...
जालना : जुना मोंढा परिसरातील मोकळ्या जागेत मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी तळीरामांचा वावर वाढला आहे. यावेळी एकमेकांमध्ये किरकोळ वादही होतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विकेल ते पिकेल अंतर्गत भरला बाजार
बदनापूर : विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत औरंगाबाद महामार्गावरील वरूडी फाटा येथे शेतकरी बाजार सुरू करण्यात आला आहे. या बाजाराचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्याहस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी आत्माचे संचालक किसनराव मुळे, डी.एल. जाधव, बाळासाहेब शिंदे आदींची उपस्थिती होती.
परतूर शहरात शिवसेनेचा महिला मेळावा
परतूर : शिवसेनेच्या वतीने शहरात नुकतेच महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख राधा वाढेकर, सविता किवंडे, पूजा टेहरे, माधव कदम, अशोक आघाव, मधुकर पाईकराव आदींची उपस्थिती होती. यावेळी ज्योती ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
आंबेकर यांची निवड
धावडा : राज्य महानुभाव संरक्षक दलाच्या अध्यक्षपदी जाळीचा देव (ता. भोकरदन) येथील संतोष आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मानव अधिकार आयोगाच्या मुंबई कार्यालयातून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. याबद्दल आंबेकर यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
कार्यकारिणी जाहीर
जालना : जालना शहर बसपा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात शहराध्यक्षपदी अब्दुल हाफीज, उपाध्यक्ष सिद्धार्थ मोरे, जिल्हा सचिव संजय खरात, कोषाध्यक्ष सागर बोर्डे, शहर सचिव संतोष मगर, विधानसभा उपाध्यक्ष उघडे आदींचा समावेश आहे.
नायगाव येथील बैठकीत विविध विषयांवर चर्चा
मंठा : तालुक्यातील नायगाव येथे राष्ट्रीय आवास योजनेचे औचित्य साधून बैठक घेण्यात आली. पंचायत समिती गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी सरपंच गजानन फुपाटे होते. यावेळी भाजयुमो तालुकाध्यक्ष अविनाश राठोड, ग्रामसेवक बी.एस. गवळी, श्रीराम चव्हाण, विनायक राठोेड आदींची उपस्थिती होती.
जलसंधारणच्या कामास सुरुवात
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे भारतीय जैन संघटना व लोकसहभागातून जलसंधारण व शेत-शिवार रस्त्यांच्या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला. यावेळी अन्वरखाँ पठाण, नरेंद्र जोगड, अविनाश कळसे, माधव शिंदे, राजेंद्र कासलीवाल आदींची उपस्थिती होती.
लोकवर्गणीतून मंदिराचे शोभीकरणाचे काम
जाफराबाद : तालुक्यातील वरुड बुद्रक येथील आई अंबिका मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच लोकवर्गणीतून करण्यात आला आहे. राजू चिडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सध्या मंदिरात मार्बल लावून गाभारा तयार करण्यात आला आहे, शिवाय कळसाचेही काम सुबक व आकर्षक झाले आहे.
रस्त्यालगत कोंबडीचे पंख; प्रवाशांना दुर्गंधी
बदनापूर : शहरातून गेलेल्या जालना-ओरंगाबाद या महामार्गावरील पुलालगत अनेक मांस विक्रेते उघड्यावर कोंबडीच्या पंखासह इतर टाकाऊ पदार्थ टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे, शिवाय कुत्रेही दुर्गंधीमुळे रस्त्यालगत थांबत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधितांनी वेळीच याकडे लक्ष द्यावे.
दानापुरातील रोहित्राची दुरुस्ती रखडली
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील बसस्थानक भागातील रोहित्राला गुरुवारी सकाळी अचानक आग लागली होती. यानंतर, काही वेळातच रोहित्रचा स्फोट झाला होता, परंतु अद्याप रोहित्राची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावाच्या मध्यभागातील वस्तीमध्ये अंधार पसरलेला आहे. वेळीच रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.